Join us

किमान पाच मोदक तरी घरी बनवाच! वेळेसाठी ऑर्डर देऊन होतो मोकळे; केळीच्या पानात वाफवल्याने नैसर्गिक चव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 1:31 PM

Ganesh Mahotsav: गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी आपण बऱ्याच रेडिमेड गोष्टी ऑर्डर करून मोकळे झालो असून, त्यात मोदकाचाही समावेश आहे.

- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी आपण बऱ्याच रेडिमेड गोष्टी ऑर्डर करून मोकळे झालो असून, त्यात मोदकाचाही समावेश आहे. तुम्ही बाहेर जरूर ऑर्डर द्या; पण किमान पाच मोदक तरी घरात बनवा, असे पाकतज्ज्ञ सांगतात. त्यामागचे नेमके शास्त्र काय हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने केलेला हा प्रयत्न !

पारंपरिक मोदकासाठी खोबऱ्याचे योग्य प्रमाण घेत त्यात गूळ मिसळून त्याचे सारण तयार केले जाते. तो मोदक हळद किंवा केळीच्या पानात ठेवून वाफवला जातो. त्यामुळे त्याला कोणताही रंग किंवा आर्टिफिशल इसेन्स न वापरता नैसर्गिकरीत्या चव आणि सुगंध येतो. त्यामुळे मोदक पचायला तर हलका होतोच त्यासोबत याच मोसमात येणाऱ्या हळदीच्या पानांचा फ्लेवर त्यात इम्युनिटी बूस्टरचे काम करतो.

मोदक तयार करण्याचे विविध तंत्रआताच्या मुली मोदकाच्या पाऱ्या जमत नाहीत म्हणून ते बनवायचा कंटाळा करतात. मात्र, वेगवेगळ्या पद्धतीने मोदक तयार करण्याचे तंत्र किंवा मेथडही उपलब्ध आहे. ज्याचा वापर करत अगदी सुरेख मोदक त्यादेखील तयार करू शकतात. दुकानातून नारळ आणून तो खवून त्यामार्फत तयार केलेले मोदक वाफवत त्याच्या सुगंधाने घर दरवळून टाकायचे, ही आपली पारंपरिक पद्धत आहे.

आंबेमोहर, इंद्रायणी आणि बासमती या पिठाचा वापर सध्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या मोदकात केला जातो. त्यासाठी लागणारे पीठ आता बाजारात उपलब्ध झाले आहे. त्याची किंमत प्रतिकिलो १६० रुपयांपासून सुरू होते.- विनोदकुमार कांजी,  व्यापारी

गणपतीत मोदकाला भरपूर मागणी असल्याने त्याचे व्यावसायिक संधीत रूपांतर करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन, तसेच ऑफलाइन क्लासेस घेतले जातात. ज्याने अगदी मार्केट स्टाइल खवा मोदकपासून ते आधुनिक फ्लेवर्सपर्यंत हे घरच्या घरी, कमीत कमी खर्चात व खूप सोप्या पद्धतीने बनवणे शक्य होते. त्याच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध करून देत तुम्ही केलेल्या मोदकाचे टेस्टिंग, तसेच वर्कशॉपनंतरही मार्गदर्शन करण्यात येते.- वैभवी जरग, मोदक क्लास शिक्षिका

...तर बाप्पाचा नैवेद्य अपूर्णलाडक्या गणरायाच्या नैवेद्याचे ताट पाहिले की, त्यात एक मुजक (तांदळाच्या पिठाची वाफवलेली मुरड), एक करंजी नेहमी दिसते. या दोन्ही गोष्टी मोदकासह ठेवल्याशिवाय नैवेद्य अपूर्णच मानला जातो. जसा मोदक बाप्पासाठी, तसेच मुजक ही शंकर, तर करंजी ही पार्वती मातेसाठीचा नैवेद्य असतो. बऱ्याच लोकांचा पीठ उरले म्हणूनही मुजक बनविले किंवा कंटाळा आला म्हणून मोदकाच्या जागी करंजी तयार केली असा समज असतो. मात्र, ते तसे नसून या सगळ्यामागे एक शास्त्र आहे.    - शेफ तुषार प्रीती देशमुख, पाकतज्ज्ञ

‘कोकण-मुंबई’ कनेक्शन! कोकणातले सावर्डे आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांतील काजूच्या बागेतून काढलेले ताजे काजू थेट किचनमध्ये पाठवित त्यापासून मोदक बनवून त्याची विक्री मुंबईत केली जाते. मंगळुरूसह व्हिएतनाम, आफ्रिका या ठिकाणाहूनही इम्पोर्टेड काजू येतात. ते रंगाने पांढरेशुभ्र असले तरी बिनचवीचे असतात. याउलट कोकणच्या मातीत असलेल्या खनिजामुळे या काजूला नैसर्गिक गोडवा प्राप्त होतो. त्यामुळे साहजिकच त्यापासून मोदक बनवण्यासाठी साखर कमी वापरावी लागते, जे १० ते १२ दिवस सहज टिकतात.   - सुजित फडतरे, काजू मोदक व्यापारी

अमेरिकेत मोदकाचा व्यवसाय पारंपरिक मोदकाची शेल्फ लाइफ जास्तीतजास्त २४ तासांची असते. विदेशात लोकांना फ्रोजन अन्न खावे लागते ज्याला ते कंटाळलेले असतात. त्यामुळे मी भारतात आले आणि आजही दुबई, सिंगापूर या ठिकाणी मोदक एक्सपोर्ट करते. बासमती तांदळाच्या पिठात खोबरं, गूळ, सुकामेवा वापरून केलेले तसेच लहान मुलांना आवडणारे चॉकलेट मिसळूनही मोदक करतात. परदेशात राहणाऱ्या नातेवाइकांकडे मी मोदकाचे पार्सल देते.  - रसिका अल्वे, मोदक एक्सपोर्टर

टॅग्स :गणेशोत्सवपाककृती