‘यंदाच्या गणेशोत्सवात देखाव्यातून सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:45 AM2019-07-21T01:45:15+5:302019-07-21T01:45:38+5:30
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून भावी पिढीला वाचवण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे.
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखाव्यातून सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळांना करण्यात आले आहे़ समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी ही माहिती दिली. याबाबतचे पत्र सर्व मंडळांना पाठवण्यात आले आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून भावी पिढीला वाचवण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे. मंडळांनी या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करून मुलांमधील कलागुणांना प्रोत्साहन द्यावे. मंडळाच्या दर्शनी भागात मोबाइल आणि सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी बॅनर लावावे, यावर चलतचित्र देखावे करावेत; जेणेकरून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये जनजागृती होईल, असे आवाहन करण्यात आले आहे. मोबाइलच्या अतिवापराचे परिणाम आपल्या शरीरावरदेखील होतात. मोबाइल आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामांबाबत समाजात जनजागृती मोहीम राबवून एक नवा संदेश देण्याचा आपण संकल्प करू या, असे आवाहन समितीने केले असल्याचे दहिबावकर यांनी सांगितले.