मुंबई : कौशल्यविकासाच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय युवकांना रोजगारक्षम बनवू, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी केला आहे. कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयात गुरुवारी ‘शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी नवीन उपक्रम’ या विषयावर एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकूर एज्युकेशनचे प्रमुख व्ही. के. सिंग आणि डी. के. पालिवाल तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यमंत्री डॉ. पांडे बोलत होते.देशाच्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक असून त्यादृष्टीने युवकांना योग्य प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यातूनच बेरोजगारीच्या समस्येचे उच्चाटन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही हेच स्वप्न असल्याचेही डॉ. पांडे म्हणाले. अकराव्या पंचवार्षिक योजनेत ३ लाख ८२ हजार इच्छुकांना आत्तापर्यंत असे प्रशिक्षण दिले गेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.देशाला जगात अग्रस्थानी ठेवण्यासाठी पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया या उपक्रमांचे महत्त्वपूर्ण योगदान राहील, असे सांगून, पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे भारताला जगातील अनेक देशांशी जोडण्याचे कार्य होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्या आयटी आणि अकाऊंट क्षेत्रात योग्य उमेदवारांची कमतरता आहे. युवकांच्या कौशल्यचा विकास करतानाच संबंधित उद्योग अथवा कंपनीची प्रगती कशी साधता येईल, याचा विचार करणे गरजेचे असल्याचे पालिवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘कोट्यवधी युवकांना रोजगारक्षम बनवू’
By admin | Published: October 21, 2016 1:48 AM