मुंबई:- दुकाने आस्थापना २०१७ च्या कायद्यातील नामफलकासंबंधी नियमांच्या दुरुस्तीबाबत महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्यावतीने कामगार आयुक्त सुरेश जाधव यांची वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेण्यात आली आणि त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी दुकानाचे फलक मराठी भाषेत असावेत तसेच दुकानाची परवानगी देताना दुकान मालक व कामगारांना मराठी भाषा येणे आवश्यक असावे, दुकानातील माहिती, वस्तूंची नावे आदी माहिती मराठीत असावी, असे कामगार कायद्यात बदल होणे आवश्यक आहे, अशा मागण्या यावेळी केल्या व त्यावर सविस्तर चर्चाही करण्यात आली.
कामगार आयुक्तांनी मराठी फलकांबाबत लवकरच बदल मंत्रालयाला सुचविण्याविषयी सांगितले असून मुंबई शहारातील तक्रारी पालिका प्रशासनाकडे करण्यास सांगितले तसेच जे दुकानदार मराठी फलक लावणार नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याविषयीच्या मागणीवर त्यांनी तशी तरतूद कायद्यात असल्याचे सांगितले.