देशाला महासत्ता बनवण्यासाठी नशामुक्ती व्हायला हवीच!
By admin | Published: October 2, 2015 01:24 AM2015-10-02T01:24:41+5:302015-10-02T01:24:41+5:30
देशाला जगात महासत्ता बनवायचे असेल, तर २०२० सालापर्यंत राज्य आणि देश नशामुक्त करणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
मुंबई : देशाला जगात महासत्ता बनवायचे असेल, तर २०२० सालापर्यंत राज्य आणि देश नशामुक्त करणे गरजेचे असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी तरुणाईने रस्त्यावर उतरत गुरुवारी आझाद मैदान ते गेट वे आॅफ इंडियापर्यंत काढलेल्या रॅलीनंतर ते बोलत होते.
बडोले म्हणाले की, नशामुक्त देश आणि नशामुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तरुण विद्यार्थ्यांवर आहे. तरुणांनीच नशेपासून दूर राहण्याचा निर्धार केला, तर संपूर्ण देशाला नवी ऊर्जा मिळेल. नशाबंदी मंडळाने सुरू केलेल्या या कामाला सामाजिक संस्थांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे २०२० सालापूर्वीच देश नशेपासून मुक्त होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास म्हणाल्या, आजच्या रॅलीमध्ये मुंबई विद्यापीठ व एसएनडीटी विद्यापीठातील एनएसएसचे विद्यार्थी, कुलाब्यातील तंबाखूमुक्त शाळेचे विद्यार्थी, मदरशांमधील विद्यार्थ्यांसह अंध विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिवाय सलाम मुंबई, नेहरू युवा केंद्र, अंनिस, खान सोशल वेल्फेअर असोसिएशन, प्रजासत्ताक भारत संघटना, मैत्री संघटना, कृपा
फाउंडेशन आणि अनेक सामाजिक संस्थांनी सामील होत ‘नशामुक्त महाराष्ट्र’ मोहिमेला पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)