गुजरातीच राजभाषा करा, मुंडे यांचा तावडेंना टोला, गुजराती चॅनेलवरून शिक्षकांना धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 05:43 AM2018-09-22T05:43:52+5:302018-09-22T05:44:11+5:30
राज्यातील शिक्षकांना वंदे गुजरात या वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा महाराष्ट्राचे गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली.
मुंबई : राज्यातील शिक्षकांना वंदे गुजरात या वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा महाराष्ट्राचे गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली.
‘मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरुन धडे’ या लोकमतच्या शुक्रवारच्या अंकातील बातमीवर मुंडे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात, सरकारला गुजरातीचे इतकेच प्रेम असेल तर महाराष्ट्राची राज्यभाषा गुजराती आणि गांधीनगर राजधानीच करून टाका, असा उपरोधिक टोला मुंडे यांनी हाणला आहे.
तावडे यांचे स्पष्टीकरण
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लोकमतच्या वृत्ताबाबत स्पष्टीकरण दिले आहे. वंदे मातरम वाहिनीवरून प्रशिक्षण दिले जाणार असल्याची बाब त्यांनी मान्य केली. ते म्हणाले की, हे प्रशिक्षण विनामूल्य असेल आणि ते पूर्णत: मराठी भाषेतूनच दिले जाणार आहे. राज्यातील शिक्षकांना पाठ्यपुस्तकांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवर प्रक्षेपणासाठी सरकारला पैसे मोजावे लागले असते, परंतु गुजरात सरकारच्या स्वत:च्या १६ चॅनेलच्या माध्यमातून हे प्रक्षेपण विनाशुल्क
दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.