होळीआधीच मुंबईत वैशाख वणवा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:56 AM2020-02-18T02:56:31+5:302020-02-18T02:57:06+5:30
हंगामातले सर्वाधिक कमाल तापमान : मंगळवारीही पारा ३७ अंशांवर पोहोचणार
मुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढतच असून, सोमवारी तर कमाल तापमानाने कहरच केला. सोमवारी मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, हवामान खात्याच्या नोंदीनुसार सोमवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. आता उत्तरोत्तर मुंबईच्या कमाल तापमानात वाढच नोंदविण्यात येणार आहे. वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची लाही लाही होत आहे. आणि विशेषत: माघ महिन्यातच मुंबईकरांना वैशाख वणवा होरपळून काढत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मुंबईचा विचार करता गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट झाली. हे किमान तापमान २० अंशांखाली नोंदविण्यात आले. तर कमाल तापमान ३२ ते ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात आले.
कमाल आणि किमान तापमानात कमालीची तफावत नोंदविण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांना थंड आणि गरम अशा संमिश्र वातावरणाला सामोरे जावे लागते आहे. दरम्यान, १८ ते २१ फेब्रुवारीदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. तर मंगळवारसह बुधवारीही मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यातील शहरांचे कमाल तापमान
मुंबई ३८.१
सोलापूर ३६
रत्नागिरी ३५.८
सांगली ३५.३
परभणी ३४.३
सातारा ३३.९
जळगाव ३३.७
पुणे ३३.७
उस्मानाबाद ३३.४
कोल्हापूर ३३
नाशिक ३२.३
माथेरान ३२.४
२५ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.६ अंश नोंदविले होते. हे आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या तापमानांपैकी सर्वाधिक कमाल तापमान आहे.
१७ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईचे कमाल तापमान ३८.१ अंश नोंदविले आहे. गेल्या दहा वर्षांतील हे सर्वाधिक तिसरे तापमान आहे. २३ फेब्रुवारी २०१५ रोजी कमाल तापमान ३८.८ अंश होते. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी कमाल तापमान ३८.८ होते. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी मुंबईचे कमाल तापमान ३९.१ अंश होते.