Join us

प्रिंटिंगच्या जगात "छाप" उमटवण्यासाठी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईसध्याच्या काळात छापील पुस्तकांचे वाचन जरी कमी झालेले असले, तरी वाचकवर्ग कमी झालेला नाही. ई-बुक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

सध्याच्या काळात छापील पुस्तकांचे वाचन जरी कमी झालेले असले, तरी वाचकवर्ग कमी झालेला नाही. ई-बुक आणि ऑनलाइन पुस्तके यांचा वाचकवर्ग खूप मोठा आहे. अशा वाचकवर्गासाठी अधिकाधिक आकर्षक आणि वाचायला सोपी पुस्तके तयार करणे, हे आजच्या काळातील प्रमुख आव्हान आहे. मुद्रण अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी येणाऱ्या काळात ई-बुक पब्लिशिंग या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. याचीच माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मुद्रण विभागातर्फे डिसेंबर महिन्यामध्ये चार दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये या क्षेत्रातील भविष्यातील विविधांगी व मुबलक संधींची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

पुणे विद्यार्थीगृहातील मुद्रण अभियांत्रिकीचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या एकत्रित सहभागातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य विषय बुक प्रॉडक्शन वर्क फ्लो हा होता, ज्यामधून बुक प्रॉडक्शन इंडस्ट्रीचे मोठे चित्र दाखविणे, हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील वास्तविक कामाच्या परिस्थितीशी परिचित करणे, कामगारांना दररोज येणा-या तांत्रिक अडचणी आणि शॉप फ्लोअर चालू ठेवण्यासाठी संभाव्य उपाययोजना करणे, हे यामधून विद्यार्थ्यांना अवगत करणे अभिप्रेत होते. शैक्षणिक क्षेत्रात, विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाची थेअरी शिकली आहे. परंतु, हे ज्ञान कोठे वापरावे, याबद्दल त्यांना मर्यादित ज्ञान आहे. शैक्षणिक आणि उद्योगातील दरी कमी करण्यासाठी या मालिकेचे नियोजन केल्याची माहिती विभागाच्या सहायक प्राध्यापिका श्रीकला कानडे यांनी दिली. बाजारामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करायला गेलो, तर साध्या पेनपासून, प्लास्टिक पिशव्या, गिफ्ट आर्टिकल, गृहोपयोगी वस्तू अशा अनेक गोष्टींवर प्रिंटिंग केलेले आपल्याला आढळते. या वस्तूंचे सुरेख पॅकिंग करण्यासाठीसुद्धा पॅकेजिंग इंडस्ट्री, पॅकिंग प्रिंटिंग यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना या दरम्यान करून देण्यात आली.

शिबिराच्या चार दिवसांत रेप्रो इंडिया कंपनीच्या सिनियर मार्केटिंग मॅनेजर हेमा माधवी, इनोवेअर कम्युनिकेशनचे प्रॉडक्शन हेड पुष्कर देशपांडे व रेप्रो इंडियाचे प्रॉडक्शन प्लॅनिंग कंट्रोल हेड सचिन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील कामाची माहिती विविध उदाहरणांतून दिली व या क्षेत्राच्या प्रचंड आवाक्याची जाणीव करून दिली. ई-बुक्स आणि बुक-ऑन-डिमांड यासारख्या पुस्तकांच्या प्रकाशनातील उदयोन्मुख ट्रेण्डविषयी, पुस्तक प्रकाशन उद्योगातील विक्री आणि विपणन क्षेत्रातील संधीविषयी, बड्या उत्पादन कंपन्यांमध्ये एमआयएसच्या वापराविषयी विद्यार्थ्यांना ओळख या शिबिरात करून देण्यात आली.