Join us

मेक इन इंडिया : मराठी तरुणाने गच्चीवर तयार केले सहा आसनी विमान

By admin | Published: February 13, 2016 9:08 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महात्वाकांक्षी मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी बीकेसीच्या एमएमआरडीए ग्राउंडवर देशविदेशातील बड्या कंपन्या दाखल झाल्या असल्या आणि नाविन्यपूर्ण

मेक इन कांदिवली: युवकाचे विमान आकर्षणाचा केंद्रबिंदू

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महात्वाकांक्षी मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी बीकेसीच्या एमएमआरडीए ग्राउंडवर देशविदेशातील बड्या कंपन्या दाखल झाल्या असल्या आणि नाविन्यपूर्ण योजना, संकल्पना जगासमोर मांडण्याची, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली असली तरी या साऱ्यात कौतुकाचा विषय ठरतोय तो म्हणजे एक मराठी मुंबईकर युवक. अमोल यादव या तरुणाने आपल्या कांदिवलीतील चारकोप भागातील इमारतीच्या गच्चीवर १७ वर्षांच्या अथक प्रयत्नाने बनविलेले अत्याधुनिक सहा आसनी विमान हे या आकर्षणाचे कारण आहे.अमोल यादव व्यवसायाने वैमानिक. पण अमेरिकेत पायलटचे प्रशिक्षण घेतानाच विमान बनवायच्या कल्पनेने त्याला झपाटले. भारतात परतल्यानंतर १९९८ साली अमोलने पहिले विमान बनविण्याच्या कामाला सुरुवात केली. विमान बनविण्याचे व्यावासायिक शिक्षण नसतानाही एका ध्यासाने अमोल विमान बनविण्याच्या मागे लागला. तांत्रिक चुकांमुळे त्याचा पहिला प्रयत्न फसला. याने खचून न जाता त्याने पुन्हा दुसरे विमान बनवायला घेतले. आधीच्या चुका टाळत चार वर्षांत म्हणजे २००३ साली त्याचे दुसरे विमान तयार झाले. अमोलने त्या विमानाच्या यशस्वी चाचण्याही घेतल्या. मात्र अशा एकट्यादुकट्याने बनविलेल्या विमानाने आकाशात आपले पंख पसरवावे आणि मुक्त भरारी घ्यावी, हे बहुधा आपल्या व्यवस्थेला मान्य नसावे. अमोलच्या विमानाला मान्यता देण्याची तरतूद आणि यंत्रणाच आपल्याकडे नव्हती. त्यामुळे अमोलचे हे दुसरे विमान एकाच जागी पडून राहीले आणि खराब झाले. दहा वर्षाची अथक साधना केवळ तरतूद नसल्याने फळली नाही. मात्र, स्वत:चे विमान उडविण्याचा अमोलचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. २००९ साली अमोलने तिसरे विमान बनवायचे काम हाती घेतले. यावेळी नागरी विमान प्राधिकरणाकडे रितसर अर्ज आणि कायदेशीर सोपस्कार यथासांग पार पडतील याची दक्षता अमोलने घेतली. जेट एअरवेजमध्ये असिस्टंट पायलट म्हणून काम करणा-या अमोलला केवळ विमान बनविण्याच्या कल्पनेने पछाडले होते. येता-जाता, उठता-बसता अमोल केवळ विमानाबद्दलच बोलायचा. त्याच्या अनेक मित्रांना विमानाचा नाद सोडण्याचाही सल्ला दिला. चांगला पायलट आहेस, कशाला नसत्या फंदात पडतोस, अशा समजुतीच्या चार गोष्टीही सांगून झाल्या. पण अमोल विमानांच्या दुनियेत रमला होता. सोसायटीच्या गच्चीवरच तात्पुरत्या शेडमध्ये अमोलचा विमान कारखाना चालूच होता. वेगवेगळे सुटे भाग मागवायचे, जोडायचे चुकले तरी पुन्हा प्रयोग करत राहायचे, असा क्रम सहा वर्षे सुरू होता. घरभर त्याचा पसारा पडलेला असायचा. पण, त्याच्या कुटुंबीयांनी, पत्नीने कधी विरोध केला नाही. साऱ्यांनी त्याला प्रोत्साहनच दिले. सतरा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आता अमोलचे तिसरे अत्याधुनिक विमान परिक्षणासाठी सज्ज झाले आहे. या १,४५० किलो वजनाच्या अत्याधुनिक सहा आसनी विमानाला स्वत:चे ‘ब्रेन’ आहे. त्यावर अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. १० फुट ८ इंचाच्या या विमानाचे ‘टीएसी-००३’ असे नामकरणही नामकरणही झाले आहे. एअर मार्शल मुरली सुंदरम आणि आयआयटी पवईच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अमोलचे विमान सज्ज झाले आहे. थर्स्ट एअरक्राफ्ट कंपनीच्या नावे अमोलचा उद्योग सुरू आहे. नागरी विमान प्राधिकरणाकडे विमानाच्या परीक्षणाची परवानगी मागितली आहे, लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास अमोल यादवने व्यक्त केला. १९९५ साली वैमानिकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी अमोल अमेरिकेत गेला. जुनी विमाने विकत घेउन, त्यातून नवीन घडविण्याच्या अमेरिकन तरुणांच्या खटापटीतून अमोललाही स्वत: विमान बनवायची इच्छा झाली. अमेरिकेत दरवर्षी सरासरी ८५० जण विमान बनविण्यासाठी अर्ज करतात. भारतात मात्र गेल्या ७० वर्षात विमानाच्या बेसिक डिझाईनवर काम करणारा पहिला आणि एकमेव भारतीय असल्याचा दावा अमोल यादव करतो. भारत विमान निर्मितीत जगाचे नेतृत्व करू शकतो. माझ्या प्रयोगातून हा विषय लोकांपर्यंत पोहचावा आणि निर्मितीची चळवळ उभी राहावी, हीच माझी इच्छा आहे. सातारा जिलह्यातील पाटण तालुक्यात अमोलचे गाव असून, त्याच्या यशामुळे गावातील लोकही खुश झाले आहेत. विभक्त कुटुंबपद्धती आता भारतीय समाजाचेच कटू वास्तव बनले आहे. अमोलचे कुटुंब मात्र त्याला अपवाद आहे. तब्बल १९ जणांचा एकत्रित कुटुंबाच्या पसाऱ्यात अमोलने विमानाचे वेड साकारले. आई-बाबा, दोन्ही काका-काकू, भावंडांनी पडत्या काळातही कुटुंबाला प्राधान्य दिले. २००७ ला जेट एअरवेजमध्ये वैमानिक म्हणून रुजू होण्यापूर्वी या यादव कुटुंबासाठी काही वर्षे प्रचंड आर्थिक विवंचनेची गेली. तरीही कुटुंबात कटुता, दुरावा आला नाही. विमानासाठी आलेल्या खर्चाचा नेमका आकडा सांगण्यास मात्र अमोल तयार नाही. मात्र, या विमानवेडापायी कोट्यवधींचा खर्च आला असण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मेक इन इंडियातून अमोलचे विमान टेक आॅफ घेईल, अशी आशा अमोलचे वडिल शिवाजी यादव व्यक्त केली. भविष्यात विमानांचा कारखाना काढण्याचा यादव कुटुंबांचा मानस असून त्यासाठी जवळपास ३०० कोटींचा निधी व ५० एकर जमीन लागेल. मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे कारखाना उभारण्याच्या मार्ग सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही काळ गोरेगावच्या महाविद्यालयात शिक्षक आणि नंतर बँकेत नोकरी करणारे शिवाजी यादव एके काळी सामाजिक चळवळीत सक्रिय होते. अमोल हाही पाटकर महाविद्यालयाचा विद्यार्थी. त्यामुळे तेथील माजी प्राचार्य उदय माशेलकर यांनी आनंद तर व्यक्त केलाच, पण त्याचे अभिनंदनही केले. त्याचा दुसऱ्या विमानाचा प्रयोग पाहायला ते गेले होते.गच्चीवर विमान बनविण्याच्या या प्रयोगाला सोसायटीने साथ दिली. शिवाय स्थानिक पोलिस व विविध यंत्रणांचे लोक या प्रयोगाने प्रभावित होत. असे काम व्हायला हवे, अशा शुभेच्छा त्याला देत.