नोकरांना पगार द्यायला नको म्हणून अपहरणाचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:06 AM2021-06-02T04:06:18+5:302021-06-02T04:06:18+5:30
व्यावसायिकाला अटक; दोन वर्षांनी गुन्ह्याचा उलगडा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नोकरांचा पगार द्यायला नको म्हणून व्यावसायिकाने स्वतःचे अपहरण ...
व्यावसायिकाला अटक; दोन वर्षांनी गुन्ह्याचा उलगडा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोकरांचा पगार द्यायला नको म्हणून व्यावसायिकाने स्वतःचे अपहरण करून जबरी चोरीचा बनाव केल्याची धक्कादायक माहिती दोन वर्षांनी उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने हॉटेल मालक किर्तेश योगेश पिपलानी (४३) या व्यावसायिकाला अटक केली.
पिपलानी याचे चांदिवलीत चिप्सी चॉप्सी, तर पवईत पराठा अशी दोन हॉटेल्स आहेत. त्याने पाेलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास नोकरांचा पगार देण्यासाठी ते ६० हजार रुपये घेऊन बँकेतून आणखी पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटर जवळ जात हाेते. दरम्यान, तेथे एक कार थांबली. कारमधील एकाने पत्ता विचारला, तर दुसऱ्याने तोंडावर रुमाल ठेवला. जाग आली तेव्हा आरेच्या रस्त्याकडेला पडून हाेताे. यात पैसे आणि मोबाइलही चोरीला गेल्याची तक्रार त्याने पाेलिसांत केली हाेती. त्यानुसार, पवई पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गुन्हे शाखेनेही याचा समांतर तपास सुरू केला होता.
चौकशीत गुन्हे शाखेला व्यावसायिकावर संशय आला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नोकरांचा पगार न देण्यासाठी हा बनाव केल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून चोरी झालेले दोन्ही मोबाइल जप्त करण्यात आले. पिपलानीला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, ते अधिक तपास करीत आहेत. व्यावसायिकाच्या या बनावाचा आर्थिक फटका नोकरांना बसला.
.............................................