Join us

‘गुमतारा’चा नकाशा तयार

By admin | Published: October 06, 2015 2:56 AM

भिवंडीतील वज्रेश्वरी मंदिरापासून एक किमीच्या अंतरावर असलेल्या सन १७०० पूर्वीच्या गुमतारा किल्ल्याची चढाई आता अधिक सुकर होणार आहे. कारण सह्याद्री प्रतिष्ठान

मुंबई : भिवंडीतील वज्रेश्वरी मंदिरापासून एक किमीच्या अंतरावर असलेल्या सन १७०० पूर्वीच्या गुमतारा किल्ल्याची चढाई आता अधिक सुकर होणार आहे. कारण सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गप्रेमींच्या संघटनेने पुढाकार घेत या किल्ल्याचा इतिहास आणि नकाशा तयार केला असून, येत्या रविवारी त्याचे फलक किल्ल्यावर लावण्यात येणार आहेत.दुर्गप्रेमींना संपूर्ण किल्ला विनात्रास फिरता यावा आणि किल्ल्याच्या इतिहासाची माहिती मिळावी, म्हणून नकाशा आणि इतिहासाची माहिती उपयुक्त ठरणार असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य गणेश रघुवीर यांनी सांगितले. रघुवीर यांनी सांगितले की किल्ल्याची योग्य माहिती मिळवण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व खात्यातील दस्तऐवजाची पाहणी करून त्यांनी किल्ल्याचा इतिहास शोधून काढला आहे. पर्यटक वज्रेश्वरी मंदिरात येतात, मात्र किल्ल्याची माहिती नसल्याने तिथूनच परत जातात. किल्ल्याच्या नकाशामुळे पर्यटकांना किल्ला फिरणे सोयीचे होणार आहे. ११ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि दुर्गप्रेमी वज्रेश्वरी मंदिराजवळ भेटणार आहेत. तिथून चढाईला सुरुवात करणार आहेत. या मोहिमेमध्ये अधिकाधिक दुर्गप्रेमींनी सामील होण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. गडावर जाण्याची वाट गोंधळाची आहे. त्यामुळे पर्यटकांना वाट शोधण्यास अडथळे येऊ नये म्हणून गडाच्या पायथ्यापासून वर बालेकिल्ल्यापर्यंत आॅइलपेंटने दिशा दर्शक बाण रेखाटण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. या दुर्गदर्शन व दुर्गसंवर्धन मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील टाकेसफाई करून बुरूज आणि तटबंदीवरील अतिरिक्त गवतही काढण्यात येईल. महत्वाच्या पुरातन ठिकाणांची स्वच्छता व गवत काढून कचरा गोळा केला जाईल. वज्रेश्वरी मंदिराजवळ आणि गडावर माहितीफलक व नकाशाफलक लावण्यात येतील.गुमतारा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मुंबईवरून येणाऱ्यांनी पश्चिम रेल्वेने वसई येथे उतरून तेथून वज्रेश्वरी मंदिराजवळ जाणारी एसटी पकडावी. मध्य व हार्बर रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांना कल्याण किंवा ठाण्यावरून भिवंडीला यावे लागेल. तिथून भिवंडी डेपोमधून वज्रेश्वरी बसने वज्रेश्वरी येथे यावे. दुचाकी वाहनाने येणाऱ्यांनी कल्याण /ठाणे-भिवंडी-आंबाडी-वज्रेश्वरी या मार्गाने यावे.अत्यंत महत्त्वाच्या सूचनापावसाळा असल्याने दुचाकी वाहनावरून प्रवास वेगाने करू नये. कारण दरड किंवा पाण्याने वाहनांची चाके घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.गडावर चढाई करताना चिखलाची व घसरणीची वाट असल्याने पायात ट्रेकिंग शूज असणे महत्त्वाचे आहे व सोबत रेनकोट असावा.सोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची दोन लिटरची बाटली आणावी.