मुंबई :- मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना शासनाने हिंदी भाषा ऐवजी मराठी भाषेचे सक्तीकरण करायला हवे असे सांगत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज दादरच्या सानेगुरुजी विद्यालयात हिंदी भाषा सक्ती विरोधात निवेदन दिले.
शासनाने पहिली पासूनच हिंदी भाषा सक्तीची केल्याने या विरोधात मनसेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली मनसेने दादर येथील सानेगुरुजी विद्यालयात हिंदी भाषा सक्ती विरोधात मुख्यध्यापकाना निवेदन दिले.
शाळेतील पाहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवर शासनाने हिंदी भाषेचे ओझे लादण्यापूर्वी त्यांची बौद्धिक क्षमता तपासायला हवी. दोन भाषा असताना आता तिसऱ्या भाषेचे ओझे ते पेलवतील का ? हे देखिल तपासले पाहिजे. एकीकडे तुम्ही दप्तराचे ओझे कमी करायला सांगता मग या भाषेचे ओझे तुम्ही का लादताय ? असा सवाल किल्लेदार यांनी केला.
शासनाने कोणतेही धोरण अवलंबण्या पूर्वी त्यावर संबंधित क्षेत्रातील तज्ञाची मते व अभिप्राय मागविले पाहिजे. यावर शिक्षण संस्था चालक, मुख्यध्यापक व शिक्षक यांनी देखील शासनाला याबाबत पटवून सांगितले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
हिंदीचे सक्तिकरण करू नका खरं तर मराठीचे सक्तीकरण केले पाहिजे.देशातील हिंदी भाषिक राज्याचा नागरिक मुंबईत आपले पोट भरण्यासाठी येतो, मग महाराष्ट्राची भाषा हिंदी असायला हवी की देशाची भाषा मराठी असायला हवी असे मत त्यांनी स्पष्ट केले.
जागर मराठीचा या अभियांनाअंतर्गत हिंदी भाषा सक्ती विरोधात मनसेने मोहिम राबविली असून याबाबतचे निवेदन सर्व शाळांमधून पोहचविणार आहे. हिंदी भाषेविरोधात शिक्षक व मुख्याध्यापकानी देखील कडाडून विरोध केला पाहिजे अशी भूमिका किल्लेदार यांनी विषद केली.