मुंबई - केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा, त्याचा प्रमाणे कोकण रेल्वेच्या दुपदरी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हॉंगकॉंगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी. रेल्वे स्थानकावरील शौचालय, फलाट तसेच ट्रकवर स्वच्छता ठेवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली. त्यांनी देखील याला तत्वता मान्यता दिली आहे.
कोकण रेल्वे मार्ग दुपदरी करण्यासाठी २० हजार कोटीचा खर्च येणार असला तरी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा विचार करता हे काम लवकर सुरू होणे अत्यंत महत्वाचे आहे, असे खासदार वायकर यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वेच्या मार्गावरील जुने भोगदे तसेच पूल यांचे वेळोवेळी सर्वेक्षण करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. या स्रर्व मागणीला सकारात्मक प्रतिसाद रेल्वे मंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.