वांद्रेऐवजी उपनगरामध्ये बनवा ‘मुंबई आय’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 02:20 AM2020-02-17T02:20:48+5:302020-02-17T02:21:04+5:30
बैठकीत कंपनी प्रतिनिधींनी व्यक्त केले मत : एमएमआरडीएच्या योजनेसाठी आठ कंपन्या उत्सुक
मुंबई : लंडन आयच्या धर्तीवर मुंबईतील वांद्रे येथे बनणाऱ्या ‘मुंबई आय’ या योजनेच्या स्थळामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित या प्रकल्पाच्या उभारणीमुळे येथील वाहतूककोंडीमध्ये आणखीनच भर पडेल, असे या कंपन्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. या योजनेसाठी एक एकरची जमीन पुरेशी नाही. यामुळे ‘मुंबई आय’ ही योजना मुंबईतील इतर भागामध्ये राबवावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) ‘मुंबई आय’ योजना राबविण्यात येणार आहे. तेरा वर्षांपूर्वी ही योजना राबविण्यात येणार होती. ही जुनी योजना आता नव्याने आलेल्या राज्य सरकारच्या काळामध्ये पुन्हा नव्याने राबविण्यात येणार आहे. यासाठी आठ कंपन्यांनी रस दाखविला असून, त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ही योजना वांद्रे येथे न राबविता, इतर भागांमध्ये राबवावी, अशी सूचना कंपन्यांतर्फे करण्यात आली. ‘लंडन आय’आणि ‘दुबई व्हील’ या प्रकल्पाची उभारणी करणाºया कंपनीने एमएमआरडीएच्या ‘मुंबई आय’ योजनेमध्ये रस दाखविला आहे.
‘मुंबई आय’च्या निर्मितीसाठी एमएमआरडीएने कंपन्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एमएमआरडीएला ‘मुंबई आय’ची उंची, पार्किंग व्यवस्था आणि निर्मिती कार्याचा कालावधी निश्चित करण्याचा सल्लाही दिला. यासह निर्मितीसाठी लागणाºया मशिनींवर इंपोर्ट ड्युटीवर सूट देण्याची मागणीही केली. यासह कंपन्यांनी तिकिटांच्या विक्रीच्या व्यतिरिक्त मुंबई आयजवळ वॉटर स्पोर्ट सुरू करण्याचेही सुचविले. यासह ‘मुंबई आय’च्या निर्मितीसाठी वेगळे स्थळही निश्चित करण्याचे सुचविले. एमएमआरडीएने या इछुक कंपन्यांना त्यांचे प्रश्न आणि माहिती ईमेलच्या माध्यमातून मागितली
आहे.