मुंबई : मुंबईबद्दल जगभरात आकर्षण असून, हे महानगर आपल्याला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर असताना येत्या काळात या अभियानात मुंबईदेखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, डीप क्लिन ड्राइव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत असून, परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे. ही मोहीम मुंबईच्या प्रत्येक गल्ली आणि रस्त्यापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येक रस्ता, गल्लीसह सार्वजनिक शौचालये नियमितपणे स्वच्छ व्हायला हवी. स्वच्छतेसोबतच झाडे लावणे, हिरवाई तयार करणे, सुशोभीकरण याकडे लक्ष द्यावे. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करून त्यांच्यावर सुशोभीकरणाची जबाबदारी सोपवावी. रुग्णालये, समुद्रकिनारे, मंडई, शाळांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.
सहायक आयुक्तांनी फिल्डवर उतरावे :
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मुंबईच्या रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांना हटवून स्वच्छता करण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी उत्साहाने योगदान देत आहेत. त्यांच्या सर्व वसाहतींच्या विकासाची कामे तातडीने सुरू करावीत. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वाॅर्डातील सहायक आयुक्तांनी थेट फिल्डवर उतरून काम करावे. वार्डांमध्ये स्पर्धा ठेवून चांगले काम करणाऱ्या वॉर्डांना गौरवण्यात यावे. यामुळे मोहिमेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.