मुंबई - राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार, आपल्या संदेशात म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.दरम्यान, राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरू आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेस या महाविकास आघाडीमधील पक्षांनी चांगली कामगिरी केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी पुरस्कृत केलेले उमेदवार विजयी ठरू लागल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचीच चलती असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
"गाव कारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा", अजित पवार यांनी दिला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 6:05 PM