मुंबई : निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आपली वसतिगृहे चांगली करून द्यावीत यासाठी व अन्य विविध मागण्यांसाठी राज्यपाल रमेश बैस याची भेट घेतली. त्या संबंधातील एक निवेदनही त्यांनी दिले आहे. मार्ड ही निवासी डॉक्टरांची संघटना गेल्या अनेक वर्षांपासून त्याच त्याच मागण्यांसाठी प्रशासन व संबंधित मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करत आहे. यापूर्वीही त्यांनी केलेल्या संपाच्या वेळी त्यांना निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची डागडुजी करण्याचे आश्वासन दिले गेले होते.
निवासी डॉक्टरांचे पदाधिकारी यांनी काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भेटून आपल्या मागणीचे निवेदन दिले होते.
काय आहेत मागण्या?वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहासाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहांची दुरवस्था आजही कायम आहे. अनेक वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक व सहयोगी प्राध्यापकांच्या जागा अनेक महिन्यांपासून रिकाम्या आहेत. त्याचा परिणाम अध्यपनावर आणि रुग्णसेवेवर होत आहे.निवासी डॉक्टरवर हल्ले होत असून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.