बीडीडीबाबत सकारात्मक निर्णय घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:27 AM2018-02-22T02:27:55+5:302018-02-22T02:27:57+5:30
शिवडी येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे करण्यात येत असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.
मुंबई : शिवडी येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे करण्यात येत असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केले.
बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत नायगाव-दादर व ना. म. जोशी मार्ग-परळ येथे उभारण्यात आलेल्या नमुना निवासी पुनर्विकास सदनिकांच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश मेहता बोलत होते.
प्रकाश मेहता म्हणाले की, बी.डी.डी. चाळीतील रहिवासी ही मुंबईची खरी ओळख आहे, ही ओळख पुसता कामा नये. या रहिवाशांना पुनर्वसित मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजेच शासनाने सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नपूर्ततेप्रति कटिबद्धता दर्शविली आहे.
सुमारे तीन ते चार दशकांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. मात्र आता हा प्रकल्प मार्गी लागला आहे. म्हाडाच्या विश्वासार्हततेचे परिमाण समोर ठेवता हा प्रकल्प यशस्वीरीत्या लवकरच पूर्ण होईल.
दरम्यान, बीडीडी चाळीतील पात्र निवासी भाडेकरूस ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची निवासी पुनर्विकास सदनिका मालकी तत्त्वावर मोफत दिली जाणार आहे.