मुंबई : कामावरून परतत असताना दोन अनोळखी इसमांनी बलात्काराचा प्रयत्न केला, असा बनाव करणे एका तरुणीला महागात पडले. ती खोटे बोलत आहे ही बाब उघड झाल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी तिच्याच विरोधात गुन्हा दाखल करीत चौकशी सुरू केली आहे.विद्या (नावात बदल) या बावीस वर्षीय तरुणीने गेल्या आठवड्यात दिंडोशी पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती. तिच्या म्हणण्यानुसार, ती काम करीत असलेल्या गोरेगाव पूर्वच्या आयटी परिसरातून ती घराच्या दिशेने येत असताना दोन अनोळखी इसमांनी तिला पकडले. त्यानंतर तिला जंगलात नेऊन तिच्यावर हल्ला करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून ती कशीबशी सुटली आणि रात्री उशिरा घरी पोहोचली, असे तिने पालकांना सांगितले. तेव्हा त्यांनी या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. मात्र त्यांना काहीच सापडले नाही. सीसीटीव्हीमध्येदेखील तिने सांगितलेल्या वेळी असे काही घडल्याचे आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी तिच्या फोनचा सीडीआर काढत त्या वेळी ती ज्या मोबाइल क्रमांकासोबत बोलत होती, तो शोधून काढला. तो नंबर तिच्या मित्राचा होता. विद्या त्या संध्याकाळी त्याच्यासोबत असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे घडलाप्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी विद्याकडे कडक भाषेत चौकशीकेली.तेव्हा तिने मित्रासोबत असल्याने उशीर झाला आणि घरचे रागावतील या भीतीने खोटे बोलल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी विद्यावरच गुन्हा दाखल केला असून, लवकरच न्यायालयात बी समरी अहवालही दाखल करण्यात येणार आहे.
जंगलात बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा बनाव; तरुणीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 1:04 AM