मुंबई : सुरक्षा सप्ताहासह एसटी महामंडळामध्ये इंधन बचत अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘करा बचत डिझेलची, होईल प्रगती एसटीची’ अशी घोषवाक्ये वापरून एसटी महामंडळ जनजागृती करणार आहे. या अभियानात जास्तीतजास्त इंधन बचत करणाºया चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या पेट्रोलिअम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाच्या निर्देशानुसार एसटीमध्ये १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी अखेरीपर्यंत इंधन बचत अभियान राबविण्यात येत आहे. एसटी महामंडळात तब्बल १८ हजार ५०० बस माध्यमातून दररोज ६६ लाख प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करते. त्यासाठी दररोज एसटीला सुमारे १२ लाख १२ हजार लीटर डिझेलची आवश्यकता असते. हे डिझेल एसटीला इंडियन आॅइल व भारत पेट्रोलिअम या भारत सरकारच्या अंगीकृत कंपन्यांद्वारे दिले जाते. साहजिकच, जागतिक बाजारपेठेतील इंधनांच्या वाढत्या किमतीचा विपरित परिणाम एसटीच्या अर्थकारणावर होणे स्वाभाविक आहे. यंदा इंधन दरवाढीचे संकट समोर असताना, एसटी महामंडळाच्या चालकांना इंधन बचत अभियानातून डिझेल वाचविणे, पर्यायाने इंधनावरील अनावश्यक खर्च टाळण्याचे समुपदेशन करण्याबरोबरच, पारंपरिक इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने सुरक्षित व सुव्यवस्थित वाहन चालविण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.व्याख्याने, माहितीपट भित्तीपत्रकाद्वारे देणार प्रोत्साहनया अभियानांतर्गत इंधन बचती संबंधीच्या जनजागृती, चालकांना व्याख्याने, माहितीपट, भित्तीपत्रके, आवाहन पत्रके या माध्यमातून प्रबोधन व प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अभियान काळात जास्तीतजास्त इंधन बचत करणाºया चालकांचा सत्कार आगार पातळीवर करण्यात येणार आहे. या अभियानाची व्याप्ती एसटी महामंडळाच्या ३१ विभागांतील २५० आगारांतील सुमारे ३५ हजार चालक व सुमारे १८ हजार यांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.