मुंबई : मुंबईतील नैसर्गिक बेटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी ५ कोटी रुपये पुरेसे असून मच्छीमार आणि कोळी संघटनांनी शिवस्मारक समुद्रात उभारण्यास विरोध केला आहे. शिवाय नवा विकास आराखडा हा कोळी आणि मच्छीमारांच्या जमिनी बळकावण्याचा डाव असल्याचा आरोपही संघटनेने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला आहे.सरकारकडून २०१२ सालापासून मच्छीमारांना ११० कोटी रुपयांचा परतावा येणे बाकी असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण केणी यांनी केला आहे. कफ परेड बंदराऐवजी मुंबईतील गोराई खाडीसमोरील बेट, मढ-वेसावातील ‘अंबव’ आणि ‘काश्या’ बेट, भाऊच्या धक्क्यासमोरील बेट, दांडा कोळीवाडासमोरील ‘तोराची बत्ती’ बेट, उत्तन वसईला ‘पोशापीर’ बेट, माऊन्ट मेरी-बॅन्ड स्टॅन्डसमोरील बेट, एरंगळ कोळीवाड्यासमोरील बेट या सात नैसर्गिक बेटांचा पर्याय केणी यांनी सुचवला आहे.मच्छीमार नेते रामदास संधे यांनी सांगितले की, १६ एकर समुद्रात भराव टाकून कृत्रिम बेट तयार करण्यासाठी शासनाला प्रचंड खर्च येणार आहे. राज्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज आहे तर दुसरीकडे स्मारकासाठी हजारो कोटी खर्च करण्याची तयारी होत आहे. कृत्रिम बेट तयार झाल्यास कफ परेड बंदरातील ३०० लहान-मोठ्या बोटींवर काम करणाऱ्या कुटुंबांचा उदरनिर्वाह हिरावला जाणार आहे.
शिवस्मारक नैसर्गिक बेटांवर करा
By admin | Published: April 08, 2015 3:39 AM