Join us  

ढाब्यावरील चौकशीतून उलगडला लुटीचा बनाव

By admin | Published: July 08, 2016 2:14 AM

ओझर डॅम ते वणीदरम्यान गुंडांनी लुटल्याचा बनाव करून एकमेकांना जखमी करणाऱ्या दुकलीचा ‘डाव’ एका ढाब्यावरील चौकशीत उघड झाला. त्यातून त्यांचा तिसरा साथीदारही पोलिसांच्या

- जितेंद्र कालेकर,  ठाणे

ओझर डॅम ते वणीदरम्यान गुंडांनी लुटल्याचा बनाव करून एकमेकांना जखमी करणाऱ्या दुकलीचा ‘डाव’ एका ढाब्यावरील चौकशीत उघड झाला. त्यातून त्यांचा तिसरा साथीदारही पोलिसांच्या हाती लागला. या दरोड्यातील नऊ कोटी १६ लाखांपैकी आठ कोटी ४० लाख ८४ हजार ८०५ रुपयांच्या रोख रकमेसह १३ जणांना अटक करण्यात आली. उर्वरित एकावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. तर आणखी दोन फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ओझरच्या डॅमवर मंगळवारी रात्री पार्टी झाल्यानंतर वणीकडे एका ओमनीतून जात असताना गाडीच्या चालकासह सहा जणांनी दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दीड ते दोन लाखांची रोकड लुटली, असा बनाव करून हरिभाऊ वाघ (४३, रा. चिंचाळे गाव, सातपूर) आणि किरण साळुंखे (रा. नाशिक) यांनी वणीच्या गस्तीवरील पोलिसांकडेच मदतीची याचना केली होती. पोलिसांनी त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करून दरोड्याचा गुन्हाही दाखल केला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि मदन बल्लाळ यांनीही त्यांची रुग्णालयात चौकशी केली. तेव्हा ‘लुटीतील एक कोटी ३६ लाखांची रोकड घेऊन पोलिसांना शरण येणार होतो, पण आमच्यावरच हल्ला झाला’ अशी माहिती त्यांनी दिली. ती खोटी असल्याचे चौकशीत उघड झाले. - ‘चेकमेट’वर दरोडा टाकल्यापासून हरिभाऊ, किरण आणि त्यांचा आणखी एक साथीदार भास्कर शिंदे (२६, रा. सातपूर, नाशिक) तिरुपती, बंगळुरू आणि शिर्डीत बरोबरच होते, अशी पक्की माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळे वणीमध्ये या दोघांना लुटले, त्या वेळी शिंदे कुठे गेला, असा प्रश्न पोलिसांना पडला. अखेर, त्यांनी जिथे पार्टी केल्याची माहिती दिली होती, त्या वणीच्या ‘मनोरंजन’ ढाब्यावर पोलिसांनी चौकशी केली. तिथेच त्यांच्याबरोबर आणखी एक साथीदार होता, अशी माहिती मिळाली. त्याआधारे हरीला ‘बोलते’ केल्यानंतर त्याने या बनावाची कबुली दिली. - भास्करने शक्कल लढवली. त्यानेच किरणला दगडाने मारहाण केली. नंतर, तो पळाल्याचेही त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी त्यालाही पोलिसांनी अटक केली. किरणचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत, तर हरीला डिस्चार्ज मिळाल्यामुळे ठाणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. - हरीच्या जव्हार येथील एका नातेवाइकाकडून एक कोटी ३६ लाखांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केली. वैभव लहांमगे (२३) आणि लक्ष्मण ऊर्फ लकी सुधाकर गोवर्धने (२३, रा. दोघेही साधेगाव, इगतपुरी) यांना नवी मुंबईतून, तर हरी वाघला नाशिकच्या रुग्णालयातून आणि भास्करला सातपूरमधून अटक करण्यात आली. त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. किरणलाही प्रकृती सुधारताच अटक होणार आहे.