Join us

मुंबईकरांचा संडे 'फॅमिली फंडे' करा; भाजप युवा मोर्चाचं पोलीस आयुक्तांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 8:33 AM

भाजप युवा मोर्चा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे ओबेरॉय हॉटेल ते एनसीपीए बिल्डिंग, नरिमन पॉइंट हा रस्ता रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत वाहनांसाठी बंद करण्याची मागणी केली आहे. 

मुंबई :  भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा मुंबई पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या बैठकीत भाजप युवा मोर्चा मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे ओबेरॉय हॉटेल ते एनसीपीए बिल्डिंग, नरिमन पॉइंट हा रस्ता रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत वाहनांसाठी बंद करण्याची मागणी केली आहे. 

या मार्गावर रविवारी सकाळी सायकलिंग, योगासने, स्केटिंग असे उपक्रम युवक व सर्वसामान्य नागरिक करतात. या काळात वाहनांची ये-जा मुंबईकरांच्या कार्यक्रमात व्यत्यय तर आणतेच, पण लहान मुलांचा जीवही धोक्यात घालतो. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तिवाना यांनीही पोलीस आयुक्तांना आश्वासन दिले की, प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्यास भाजप युवा मोर्चा मुंबईचे पदाधिकारी स्वत: 6 ते 10 पर्यंत वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या सोयीची काळजी घेतील. आम्ही दर रविवारी प्रशासनाला स्वयंसेवक म्हणून सहकार्य करू. 

याचबरोबर,प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बीजेवायएमचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, रविवार मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मुंबईकरांचा विश्रांतीचा, भेटण्याचा, सायकल चालवण्याचा, मौजमजा करण्याचा, त्यांचे कौशल्य दाखवण्याचा आणि कुटुंब मौजमस्तीचा उत्सव असला पाहिजे. या उद्देशाने आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे की दर रविवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत एनसीपीए बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह रोड ते ओबेरॉय हॉटेल येथे वाहनांवर बंदी घातली पाहिजे जेणेकरून मुंबईकरांना कोणताही संकोच न करता 'फॅमिली फंडे' साजरा करता येईल. मुंबईकरांच्या सहकार्यासाठी आयुक्त लवकरच याबाबत आदेश जारी करतील आणि आपण सर्वजण मिळून प्रत्येक रविवारी 'फॅमिली फंडे' साजरा करू, अशी आशा आहे.

टॅग्स :मुंबईभाजपापोलिस