Join us

सरकारी नोकर भरतीचा मार्ग माेकळा; सरळसेवा काेट्यातील ७५ हजार पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 6:04 AM

राज्य सरकारने हटवले निर्बंध

मुंबई : राज्यात ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा केलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने त्या दृष्टीने ठोस पाऊल टाकत यापूर्वी नोकर भरतीवर असलेले निर्बंध हटविले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सरळसेवा कोट्यातील ७५ हजार  पदे भरण्याचा सरकारचा मानस असून, त्याच्या पूर्ततेसाठी शासन आदेश काढण्यात आला. ज्या विभागांचा/ कार्यालयांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा दिली आहे. 

रिक्त पदे १००% भरण्यास मुभा-

३० सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतिबंध निश्चित झालेल्या विभागांना एमपीएससी कक्षेतील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली होती. अन्य संवर्गातील रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्याची मुभा होती.

या विभागांना दिली परवानगी-

ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. 

शिथिलता मर्यादित काळासाठी-

नोकर भरतीवरील निर्बंधांतून दिलेली शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :नोकरीमहाराष्ट्र सरकार