‘मेक इन इंडिया’चा मार्ग मोकळा
By admin | Published: February 12, 2016 03:19 AM2016-02-12T03:19:35+5:302016-02-12T03:19:35+5:30
आगामी महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे़ शिवसेनेच्या प्रकल्पांमध्ये खो घालणाऱ्या भाजपाला आपल्या
मुंबई : आगामी महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचे राजकारण रंगले आहे़ शिवसेनेच्या प्रकल्पांमध्ये खो घालणाऱ्या भाजपाला आपल्या उपक्रमाचा मार्ग मोकळा करून घेण्यात यश आले आहे़ केंद्राच्या या प्रकल्पासाठी आपले वजन वापरत भाजपाने ‘मेक इन इंडिया’करिता सर्व नियम धाब्यावर बसवत शिवसेनेवर मात केली आहे़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ हा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे नेते कामाला लागले आहेत़ शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे़ नियमांनुसार प्रत्येक कामासाठी निविदा मागवून ठेकेदार नेमण्यात येतो़ मात्र ‘मेक इन इंडिया’साठी हा नियम मोडीत काढण्यात आला आहे़ अशा कार्यक्रमांच्या तयारीसाठी अनेक परवानग्या मिळविण्याकरिता किमान दोन महिन्यांचा कालावधी लागतो़
मात्र ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम या नियमांमध्ये अपवाद ठरविण्यात आला आहे़ त्यात निविदांविनाच ठेकेदार नेमणे, होर्डिंग्ज आणि पोस्टर्ससाठी शुल्क न आकारणे अशी सूट दिली आहे़ या कार्यक्रमाला तत्काळ सर्व परवानग्या देण्याची ताकीदच सर्व संबंधित खात्यांना देण्यात आली होती़ एवढेच नव्हे, तर घाईघाईने स्थायी समितीमध्ये या कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व प्रस्ताव तत्काळ मंजूर केले़ (प्रतिनिधी)
या कामांना थेट परवानगी
सात ठिकाणी मेक इन इंडियाचा सिंह उभारणे, तीन ठिकाणी भिंत रंगविणे, २० ठिकाणी होर्डिंग्ज, दीडशे बॅनर्स, वांद्रे-कुर्ला संकुलात व्यासपीठ उभारणे, मेक इन इंडियावर ५ मिनिटांचा माहितीपट
१३ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पालिकेने १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे़ वांद्रे-कुर्ला संकुल आणि गिरगाव चौपाटी येथे हा कार्यक्रम होणार आहे़ पालिका अधिनियम १८८८, (७२) (३) या कलमाचा आधार घेत पालिका आयुक्तांना असलेल्या विशेष अधिकारात निविदा न मागविताच या कार्यक्रमाच्या तयारीसाठी ठेकेदार नेमण्यात आला़
या कार्यक्रमात ३० देशांचे प्रतिनिधी व २ हजार उद्योजक सहभागी होतील, असे अपेक्षित आहे़ यामधून मुंबईलाही आर्थिक मदत मिळवण्यासाठी महापालिका शहराचे टेक ओव्हर प्लॅन सादर करणार आहे़ याअंतर्गत १५ फेब्रुवारी रोजी परिसंवाद होणार आहे