मुंबई : पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यावर आरे कॉलनीतील मेट्रो तीनचे कारशेड स्थलांतरित करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला असला तरी याच कॉलनीत असलेल्या मेट्रो भवनच्या मार्गात मात्र कोणताही अडथळा येणार नसल्याचे समजते.
मेट्रो भवनच्या बांधकामालाही पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. परंतु, सरकारने वनासाठी राखीव ठेवलेल्या ६०० एकर जागेत मेट्रो भवनचा प्रस्तावित भूखंड येत नाही. तसेच, येथील वृक्षतोडही मर्यादित आहे. त्यामुळे या जागेला ग्रीन सिग्नल मिळेल, असे संकेत सरकारकडून मिळत असल्याची माहिती एमएमआरडीएतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
मुंबई मेट्रो रेल प्रोजेक्टच्या १४ मेट्रो मार्गिकांच्या (३३७ किमी) एका ठिकाणाहून परिचलनासाठी नियंत्रण केंद, मेट्रो निगडित तांत्रिक कार्यालये आणि मेट्रो प्रशिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी गोरेगाव आरे कॉलनी येथील हरित क्षेत्रात मोडणाºया २.३० हेक्टर जागेची निवड झाली आहे. १५४ मीटर उंचीची २७ मजली भव्य इमारत येथे उभी राहील. या कामासाठी १ हजार ७६ कोटींचा खर्च होईल.
गेल्या आठवड्यात आरे कॉलनीतील ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याची घोषणा झाल्यानंतर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसोबतच मेट्रो भवनाच्या भवितव्याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र, कारशेडचे स्थलांतर झाले तरी मेट्रो भवन येथेच उभारण्यास सरकार अनुकूल असल्याचे एमएमआरडीए सूत्रांनी सांगितले.
मेट्रो भवनाच्या इमारतीची उंची जास्त असल्यामुळे तिची फूट प्रिंट कमी असेल. त्यामुळे येथील जास्तीतजास्त वृक्षांसह पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केला जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
आरेतल्या प्रत्येक इंच जागेसाठी लढू
सरकारने जाहीर केल्यानुसार आरेमधील नेमके कोणते क्षेत्र वनासाठी राखीव असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिसचूना निघाल्यानंतर त्यावर प्रकाश पडेल. मात्र, काहीही झाले तरी आरे कॉलनीत मेट्रो कारशेड किंवा मेट्रो भवन उभारू देणार नाही. इंच इंच जागेसाठी आम्ही नेटाने लढू.- अॅड. रोहित जोशी, कारशेड विरोधातील याचिकाकर्ते