आरे पुलाचे काम युद्धपातळीवर करा, रहिवाशांना सहकार्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:55 AM2017-09-29T03:55:47+5:302017-09-29T03:55:57+5:30
आरेच्या मुख्य रस्त्यांवरील खचलेल्या पुलाचे नव्याने करण्यात येणारे काम दिवस-रात्र करून युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री रवींद्र वायकर
मुंबई : आरेच्या मुख्य रस्त्यांवरील खचलेल्या पुलाचे नव्याने करण्यात येणारे काम दिवस-रात्र करून युद्धपातळीवर पूर्ण करावे, असे निर्देश राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिका तसेच आरेच्या अधिकाºयांना दिले. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत आरेतील रहिवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मुसळधार पावसामुळे गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी युनिट क्रमांक २ जवळील मुख्य रस्त्यावरील पूल अचानक खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा पूल खचल्याची माहिती मिळताच वायकर यांनी स्वत: पाहणी करत पुलाच्या दुरुस्तीचा आढावा घेतला. या वेळी नगरसेविका रेखा रामवंशी, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, सहायक पोलीस निरीक्षक लोखंडे, मनपाचे अभियंता अमित पाटील, माजी नगसेवक जितेंद्र वळवी, शाखाप्रमुख संदीप गाढवे उपस्थित होते.
हा मुख्य रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असल्याचे वायकर यांनी सांगितले. सध्याचा पूल हा ७ मीटर रुंद असून, तो २० मीटर रुंद करण्यात येणार आहे. पूल, रस्ते, नाले, गटारे इत्यादी कामांसाठी साधारणत: २५ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती महापालिकेने या वेळी वायकर यांना दिली. पूल नव्याने उभारण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे कामाच्या ठेकेदारांनी वायकर यांना सांगितले. पुलाचे काम दिवस-रात्र केल्यास २ ते ३ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होऊ शकते. त्यानुसार ठेकेदारांनी प्रयत्न करावा, अशा सूचना वायकर यांनी या वेळी केल्या.