‘योग’ करा; ‘योग्य’ बनाल! - व्यंंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 04:37 AM2017-12-25T04:37:35+5:302017-12-25T04:37:39+5:30

‘योग’ केल्यानंतर मला काय मिळेल, असा प्रश्न मला एकाने केला; तेव्हा ‘योग’ केल्याने तुम्ही ‘योग्य’ बनाल, असे उत्तर त्याला दिले, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Make 'yoga'; Become 'Eligible'! - Vyankanyya Naidu | ‘योग’ करा; ‘योग्य’ बनाल! - व्यंंकय्या नायडू

‘योग’ करा; ‘योग्य’ बनाल! - व्यंंकय्या नायडू

Next

मुंबई : ‘योग’ केल्यानंतर मला काय मिळेल, असा प्रश्न मला एकाने केला; तेव्हा ‘योग’ केल्याने तुम्ही ‘योग्य’ बनाल, असे उत्तर त्याला दिले, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. जगातील सर्वांत जुनी योग संस्था असलेल्या योग इन्स्टिट्यूटच्या शतक महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सांताक्रुझ येथे आयोजित या समारंभात राज्यपाल विद्यासागर राव, शिक्षणमंत्री विनोद तावडे, योग इन्स्टिट्यूटच्या संचालिका हंसा जयदेव योगेंद्र, साहाय्यक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र, पंतप्रधान मोदी यांचे योगगुरू डॉ. एच.आर. नागेंद्र, हृषीकेषच्या परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती, सीबीआयचे माजी संचालक डॉ. डी.आर. कार्तिकेयन, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी, लोणावळ्याच्या कैवल्यधामचे सीईओ सुबोध तिवारी आणि दिल्लीच्या मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ योगाचे संचालक डॉ. ईश्वर बसवरेड्डी या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
उपराष्ट्रपती नायडू पुढे म्हणाले, गृहस्थाश्रमात राहणाºयांसाठी योग इन्स्टिट्यूट गेल्या १०० वर्षांपासून कार्यरत आहे, ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. अवघ्या एक एकर परिसरात योग इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. खरे तर मुंबईतील एक एकर म्हणजे गावाकडचे शंभर एकर म्हणावे लागेल. पण इथल्या व्यक्तींची हृदये अत्यंत विशाल आहेत. योगेंद्र यांच्या संपूर्ण परिवाराने योगाला वाहून घेतलेले आहे, त्यामुळेच मी येथे येण्यास प्रवृत्त झालो. डॉ. जयदेव आणि हंसाजी यांनी अनेकांच्या आयुष्यात योगाच्या माध्यमातून चैतन्य निर्माण केले. आपण आपली पाळेमुळे हरवून बसलो आहोत, ती योगाच्या माध्यमातून पुन्हा मिळवू शकू.
स्वागतपर मनोगत व्यक्त करताना हंसा जयदेव म्हणाल्या, गेल्या शंभर वर्षांपासून योग इन्स्टिट्यूट अव्याहतपणे योगसेवेचे कार्य करत आहे. अनेक कठीण प्रसंग आले तरीही हे कार्य थांबलेले नाही. शंभराव्या वर्षात पदार्पण करत असताना देशभर आणि जगभर विविध यौगिक कार्यक्रमांचे आयोजन आम्ही करत आहोत. जगभर शांतीसाठी भारताची नव्याने ओळख निर्माण व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
सीबीआयचे माजी संचालक डॉ. डी.आर. कार्तिकेयन यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, योग इन्स्टिट्यूटचे कार्य अतिशय मौलिक आहे. धकाधकीच्या आयुष्यात योगाच्या माध्यमातून तुम्ही संतुलित आयुष्य जगू शकता. पंतप्रधान मोदी नवरात्रीच्या काळात अमेरिका दौºयावर होते, तेव्हा त्यांनी केवळ योगाच्या बळावर स्वत:ला नियंत्रित ठेवले. त्या काळात योग सामर्थ्यामुळेच ते उपवास करू शकले. त्यानंतर तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामादेखील योगाकडे आकृष्ट झाले होते.
अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी म्हणाले, पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी मी विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि श्री श्री रविशंकर यांच्यासह ‘युनो’त उपस्थित होतो. त्या वेळी भारताची क्षमता जगाला कळून चुकली. पंतप्रधान मोदी यांच्यासारख्या सतत व्यस्त असलेल्या व्यक्तीला योगासाठी वेळ मिळू शकतो, मग आपल्याला का नाही? त्यामुळे स्वत:साठी वेळ द्यायलाच हवा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

हृषीकेशच्या परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांचे भाषण अतिशय रंजक आणि खुसखुशीत झाले. योग इन्स्टिट्यूटचे ऋषी हे तरुणपणी योगाकडे वळले याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
हल्ली लोक योगाश्रमात आल्यानंतर ‘वाय-फाय’ आहे का, असा प्रश्न करतात; त्यांना मी एकच सांगतो ‘वाय-फाय’ नव्हे तर ‘व्हाय आय?’ महत्त्वाचे आहे... असे म्हणताच एकच हशा पिकला.
‘वाय-फाय’नंतर त्यांनी आपला मोर्चा वळविला ‘इंटरनेट कनेक्शन’कडे. ‘इंटरनेट कनेक्शन’पेक्षाही ‘इनर कनेक्शन’ महत्त्वाचे आहे, हे सांगताच उपस्थित योगप्रेमींनी त्यांना प्रचंड दाद दिली.

Web Title: Make 'yoga'; Become 'Eligible'! - Vyankanyya Naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.