तुमची शाळा सुंदर बनवा आणि जिंका ५१ लाखांची बक्षिसे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 09:38 AM2023-12-23T09:38:42+5:302023-12-23T09:40:35+5:30
अभियानात राज्यात पहिल्या येणाऱ्या शाळेस तब्बल ५१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
मुंबई : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण, आनंददायी वातावरण तयार व्हावे, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान जाहीर केले आहे. या अभियानात राज्यात पहिल्या येणाऱ्या शाळेस तब्बल ५१ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्यात ४७८ शाळांचा समावेश असून, सर्व व्यवस्थापनांच्या, माध्यमांच्या शाळांना यात सहभागी होता येणार आहे. मुंबई महापालिका, वर्ग-अ आणि वर्ग-ब महानगरपालिका शाळा, उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात मूल्यांकन करण्यासाठी राज्यासह अन्य पातळ्यांवर समित्या कार्यरत असणार आहेत.
काय आहे अभियान?
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी, क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व, शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करण्यासाठी हे अभियान आहे. हे अभियान ४५ दिवस राबविले जाईल. शाळांसाठी विद्यार्थिकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण १०० गुण असतील.
शाळांना आवाहन :
सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी याबाबतचा शासन आदेश वाचून त्यानुसार अतिशय छोट्या- छोट्या गोष्टींचे नियोजन करून या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. शासनाने लाखो रुपयांची बक्षिसे यासाठी ठेवली असून, ती मिळविण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
अभियानाची उद्दिष्टे :
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.
शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरण निर्मिती करणे.
क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे.
कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे.
राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे.
अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणे.
शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे.
तालुका, जिल्हा, विभागनिहाय पारितोषिके :
मुंबई महापालिका क्षेत्रातील तसेच अव ब वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना अनुक्रमे २१ लाख, ११ लाख आणि सात लाख बक्षीस मिळेल.
तालुका, जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके मिळतील. राज्यस्तरावरील अनुक्रमे ५१, २१ आणि ११ लाखांचे बक्षीस असेल.