मालवणीतील प्रकार; विनामास्क फिरताना हटकल्याचा राग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रिक्षात मास्क न घालता बसलेल्या मेकअप आर्टिस्टला पालिकेच्या ‘क्लीनअप’ मार्शलने थांबवून दंड भरायला सांगितला. मात्र, चूक कबूल न करता थेट मार्शलला शिवीगाळ करत महिलेने मारहाण करण्यास सुरुवात केली. शुक्रवारी हा प्रकार चारकोपमध्ये घडल्यानंतर शनिवारी तिला अटक करण्यात आली.
कांदिवलीतील डहाणूकरवाडी सिग्नल परिसरात हा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी घडला. झैनाब शेख ही मालवणी येथून मास्क न घालता रिक्षात बसून डहाणूकरवाडीला निघाली होती. त्या वेळी पालिकेच्या क्लीनअप मार्शल अश्विनी गुंजन यांनी तिला पाहिले व रिक्षा अडवली. मास्क न घातल्याबाबत जाब विचारत दंडाची रक्कम भरायला सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख ही गुंजनसोबत वाद घालत तिला शिवीगाळ करू लागली. त्यानंतर हा प्रकार झटापटीवर गेला. गुंजनच्या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी शेखवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.
‘शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्यानुसार आम्ही क्लीनअप मार्शलला मारहाण करणाऱ्या महिलेवर कारवाई केली’, अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी दिली.
..................................