एचयूआयडी हॉलमार्किंग अनिवार्य करणे हा सरकारचा मनमानी कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:05 AM2021-08-23T04:05:27+5:302021-08-23T04:05:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्वेलरी हॉलमार्किंगसाठी असणारी नवीन हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन प्रक्रिया ग्राहकांसाठी अनुकूल नसून ती व्यापाऱ्यांच्या देखील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्वेलरी हॉलमार्किंगसाठी असणारी नवीन हॉलमार्किंग युनिक आयडेंटिफिकेशन प्रक्रिया ग्राहकांसाठी अनुकूल नसून ती व्यापाऱ्यांच्या देखील विरोधात आहे. त्यामुळे सर्व सराफा व्यापारी या निर्णयाच्या विरोधातच आहेत, असे मुंबईमधील सराफा व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. हॉलमार्किंग युनिट आयडेंटिफिकेशनच्या विरोधात देशभरातील सराफा व्यापारी संप पुकारणार आहेत. मुंबईतील सराफा व्यापारी देखील या एक दिवसाच्या सांकेतिक संपात सहभागी होणार आहेत. रत्ने आणि आभूषण उद्योगाच्या चारही झोनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३५० संघटना यात सहभागी होणार आहेत.
आम्ही हॉलमार्किंग प्रक्रियेचे स्वागत करतो; पण परंतु आमच्यावर लादलेली हॉलमार्किंग युनिक आयडी या प्रक्रियेमुळे दागिन्यांच्या सुरक्षेला एक प्रकारे धोका पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे यात ग्राहकांचे हित देखील जपले जाणार नाही. यासाठी आम्ही सोमवारी शांततापूर्ण निषेध व्यक्त करणार आहोत.
- अशोक मिनावाला (सदस्य, राष्ट्रीय टास्क फोर्स ऑन हॉलमार्किंग)
व्यापारी हिरालाल शाह म्हणाले, आम्ही दागिन्यांना अधिकृतरीत्या हॉलमार्क करतो. असे असतानाही हॉल मार्किंग युनिट आयडी प्रक्रियेची गरज नसताना अंमलबजावणी करायला लावणे म्हणजे हा मनमानी कारभार आहे. या प्रक्रियेमध्ये वेळ वाया जातो त्याच प्रमाणे ग्राहकांच्या दृष्टीनेदेखील अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे ही प्रक्रिया रद्द करायलाच हवी.
१६ जूनपासून २५६ जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले गेले आहे. या नवीन प्रक्रियेने एका उत्पादनाला हॉलमार्किंग करण्यासाठी ५ ते १० दिवस लागतात. अशाप्रकारे वर्षांचे उत्पादन चिन्हांकित करण्यासाठी जवळपास ८०० ते ९०० दिवस लागू शकतात त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे.
- दिनेश जैन (सदस्य, राष्ट्रीय कार्यदल हॉलमार्किंग)