अरुण गवळीविरोधातील मकोकाचे पेपर्स गहाळ; गुन्हे शाखेची विशेष न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:14 AM2024-07-08T06:14:30+5:302024-07-08T06:14:38+5:30

गवळीच्या वकिलाने खंडणी प्रकरणात उलटतपासणीसाठी कागदपत्रांची मागणी केली होती

Makoka papers against Arun Gawli missing Information of Crime Branch to Special Court | अरुण गवळीविरोधातील मकोकाचे पेपर्स गहाळ; गुन्हे शाखेची विशेष न्यायालयाला माहिती

अरुण गवळीविरोधातील मकोकाचे पेपर्स गहाळ; गुन्हे शाखेची विशेष न्यायालयाला माहिती

मुंबई : खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट (मकोका) लागू करण्यासंदर्भातील कागदपत्रे गहाळ असल्याची माहिती शुक्रवारी क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी विशेष मकोका न्यायालयाला दिली.

शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरुण गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे. कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि २००५ मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणमधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप गवळी आणि त्याच्या टोळीतील काही जणांवर आहे.

गवळीच्या वकिलाने खंडणी प्रकरणात उलटतपासणीसाठी कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, विशेष सरकारी वकिलांनी, २०१३ मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली कागदपत्रे सापडत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. 

गेल्या महिन्यात न्यायालयाने पोलिसांना कागदपत्रांवरून सुनावले होते. अस्पष्ट विधाने मान्य केली जाणार नाही. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना खडसावले होते. 

यापूर्वी, न्यायालयाने बचाव पक्षाच्या मागणीनुसार कागदपत्रे सादर करण्यासाठी सरकारी वकिलांना १५ दिवसांची मुदत दिली होती. मात्र, गेल्या सुनावणीदरम्यान गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रे सापडत नसल्याचे अहवालात म्हटले होते.

प्रकरण काय?

 २००५ मध्ये शहरातील एका बिल्डरला गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते आणि राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती.

 बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तसेच गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मकोका लावण्यात आला होता.

Web Title: Makoka papers against Arun Gawli missing Information of Crime Branch to Special Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.