मुंबई : गुटखा कंपन्यांचे मालक तसेच अवैध गुटखा विक्री व्यवसायाचे सूत्रधार यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी याबाबतचे सूतोवाच केले. ज्या क्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होत असल्याचे आढळेल तेथील अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यापुढच्या काळात राज्यात गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना मकोका लावण्याचे विचााराधीन आहे. गुटखाविक्रीला संरक्षण देत्णाºया अधिकाºयांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पवार यांनी दिला.
उपस्थित मंत्री आश्चर्यचकित
सध्या राज्यात विक्री होत असलेल्या गुटखा व प्रतिबंधित सुपारी, मावा, खर्रा यांच्या ब्रँडची नावेही त्यांनी बैठकीत वाचून दाखवली व त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच नावे वाचून दाखविल्याने उपस्थित मंत्री व अधिकारी अवाक् झाले.