Join us

मलबार हिल जलाशयाला मोठ्या दुरुस्तीची गरज नाही; ४ तज्ज्ञांचा निर्वाळा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 10:26 AM

निर्णय लवकरच होण्याची शक्यता.  

मुंबई : ब्रिटिशकालीन असलेले मलबार हिल जलाशय आजही मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे मेजर दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचे तज्जांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री म्हणून याचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पश्चिम उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी संदर्भातील अंतरिम अहवाल सादर होऊन महिना उलटला आहे मात्र अजूनही अंतिम अहवाल पालिका प्रशासनाला मिळू शकलेला नाही. आठ तज्ज्ञांच्या समितीमधील ४ तज्ज्ञांनी आपली मते अंतरिम अहवालात सादर केली आहेत. 

अद्यापही ३ तज्ज्ञांची मते बाकी असून ती सादर का होत नाहीत, यावर पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आय. आय. टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

टप्प्याटप्प्यात दुरुस्ती :

अंतरिम अहवालातील निरीक्षणाप्रमाणे जलाशयाच्या पुनर्बांधणीचे धोरण पूर्णतः रद्द करावे आणि जलाशयाच्या किरकोळ दुरुस्त्या टप्प्याटप्प्यात आवश्यकतेप्रमाणे हाती घ्याव्यात अशी मागणी पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, आयआयटी संस्थेने पालिकेला सादर अहवालाच्या निकष, निरीक्षणांच्या आधारावरच जलाशयासंबंधित अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खुल्या मैदानासाठी आयुक्तांना भेटणार :

मैदाने, क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याची पॉलिसी तयार करण्यात आली असून, पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची भेट घेणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले. मुंबईत एक हजारांहून अधिक मैदाने, क्रीडांगणे असून ती दत्तक तत्त्वावर देण्याचे प्रस्तावित आहे.

टॅग्स :मुंबईमलबार हिल