मलबार हिल जलाशय नव्याने नाही बांधणार, फक्त होणार दुरुस्ती
By जयंत होवाळ | Published: June 7, 2024 09:48 PM2024-06-07T21:48:08+5:302024-06-07T21:48:27+5:30
जलाशयाच्या नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल ३९३ झाडांची कत्तल होणार होती
मुंबई : दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुना असलेला हेरिटेज दर्जाचा मलबार हिल जलाशय नव्याने बांधण्याचे टेंडर मुंबई महापालिका रद्द करणार आहे. हा जलाशय केवळ दुरुस्तीने सुस्थितीत येऊ शकतो असा अहवाल तज्ज्ञ समितीने दिल्यामुळे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे मलबार हिलचे सुप्रसिद्ध हँगिंग गार्डनलाही धक्का बसणार नाही.
मलबार हिल जलाशय १३६ वर्षे जुना असून दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. जलाशय नव्याने बांधायचा झाल्यास अनेक झाडांचा बळी जाणार होता. शिवाय या ठिकाणच्या मोकळ्या जागेलाही फटका बसणार होता. त्यामुळे जलाशय नव्याने बांधण्याच्या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता. जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी येणाऱ्या ७०० कोटींच्या खर्चावरही स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
जलाशय नव्याने बांधल्यास हँगिंग गार्डनलाही फटका बसणार होता. दरम्यान, नव्याने जलाशय बांधण्यास स्थानिकांचा होणार्या विरोधामुळे टेंडर रद्द करण्याबाबत आज पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची बैठक झाली. या बैठकीत मलबार हिल जलाशयाची दुरुस्ती करताना झाडे, पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, याची काळजी घ्या, असे निर्देश लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिले .
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा १८५ .९४ कोटी रुपयांचा प्रकल्प २०१७ साली प्रस्तावित होता. हा खर्च आता ७०० कोटींवर पोहचला होता. मलबार हिल जलाशयाच्या ५ टाक्यांची जलधारण क्षमता एकूण १४७.७८ दशलक्ष लिटर असताना त्यामधील केवळ ७९.७३ दशलक्ष लिटर पाणीसाठाच वापरला जातो. मग नवीन जलाशयाच्या पुनर्बांधणीचा घाट पालिका प्रशासनाने का घातला, असा प्रश्न उपस्थित केला होता.
जलाशयाच्या नवीन टाकीसाठी हँगिंग गार्डन परिसरातील तब्बल ३९३ झाडांची कत्तल होणार होती. ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशय तब्बल १३६ वर्षे जुना आहे. सध्याच्या फिरोजशाह मेहता उद्यानाच्या (हँगिंग गार्डन) खाली १८८७ मध्ये बांधलेल्या या जलाशयामार्फत कुलाबा, फोर्ट, सीएसएमटी, कफ परेड,नरिमन पॉइंट, चर्चगेट, सँडहर्स्ट रोड, गिरगाव, काळबादेवी, मलबार हिल, नेपियन्सी रोड,ग्रँट रोडमधील विविध भागात पाणीपुरवठा केला जातो.दक्षिण मुंबईची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन या जलाशयाची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली होती. पुनर्बांधणीनंतर सध्याच्या जलाशयाची दररोज सुमारे १५० दशलक्ष लिटरची क्षमता १९० दशलक्ष लिटरपर्यंत वाढवण्याची योजना होती.