मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा तिढा वाढत आहे. टाक्या पूर्णपणे मोकळ्या केल्याशिवाय काम होणार नसून, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नवीन टाकीची बांधणी करावी लागणार असल्याचे आठ सदस्यीय समितीमधील ४ तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, समितीमधील उर्वरित सदस्यांनी या अहवालाला संमती दर्शविलेली नाही. त्यामुळे अंतिम निर्णयासाठी पालिका नेमके काय धोरण अवलंबणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद हा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. यावर सातत्याने पालकमंत्र्यांसह आयुक्त आणि स्थानिकांच्या बैठका होत आहेत. मात्र, यावरील अंतिम निष्कर्षासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीमध्येच आता फूट पडली असून, त्यांनी दोन वेगवेगळे अहवाल सादर केले आहेत. यामुळे तज्ज्ञांमध्येच मतभेद असल्याचे दिसून आले.
याआधी वास्तुविशारद आणि स्थानिक यांनी सादर केलेल्या अहवालात मलबार हिल जलाशयाला पुनर्बांधणीची आवश्यकता नसून, किरकोळ दुरुस्त्या नवीन टाकी न बांधता केल्या जाऊ शकणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. तर आयआयटी तज्ज्ञांसह, पालिका अधिकारी अशा ४ सदस्यांनी नव्याने सादर केलेल्या अहवालात जलाशयाला पुनर्बांधणीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी आधी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे मागील ४ ते ५ महिन्यांपासून सुरू असलेल्या भेटी आणि बैठकांमधून तज्ज्ञ एक अंतिम निष्कर्ष निश्चित करू न शकल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
अहवाल काय सांगतो...
१) आयआयटी तज्ज्ञांच्या अहवालानुसार, मलबार हिल जलाशयाची तत्काळ स्वच्छता हाती घेणे आवश्यक आहे. त्यातील गाळ, टाकीच्या भिंतीचा साचलेला कचरा, उद्यानातील झाडाझुडपांचा कचरा, जीर्ण जलवाहिन्या आणि पायऱ्यांचा कचरा पाण्यातून काढणे आवश्यक आहे.
२) मलबार हिल जलाशयाच्या दुरुस्त्या जरी टप्प्याटप्प्याने हाती घेतल्या तरी त्याआधी जवळपास ५२. ४४ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची साठवण क्षमता असलेली पर्यायी व्यवस्था उभी करणे आवश्यक असणार आहे.
तज्ज्ञांचे २ अहवाल सादर झाले आहेत. त्यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. आम्ही यावर ठोस तांत्रिक दृष्ट्या अमलबजावणी करता येईल असे मत घेण्याचा प्रयत्न करत आहोत.- पी वेलारासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त