५० हजार स्क्वेअर फुटांमध्ये उभारले ‘मलाबार नॅशनल हब’; ४० हजार कोटींचा ग्रुप मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 09:47 AM2023-09-30T09:47:58+5:302023-09-30T09:48:38+5:30
रत्न, आभूषण उद्योगात भारत पहिल्या क्रमांकावर येईल - फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ४० हजार कोटींची उलाढाल असलेल्या ‘मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंड्स समूहा’ने मुंबईत आगमन केले असून, मरोळ एमआयडीसी येथे ५० हजार स्क्वेअर फुटांमध्ये ‘मलाबार नॅशनल हब’ उभारले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे शानदार उद्घाटन झाले. ‘लोकमत’च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा, ‘मलाबार ग्रुप’चे अध्यक्ष एम. पी. अहमद, उपाध्यक्ष अब्दुल सलाम केपी, कार्यकारी संचालक (इंडिया ऑपरेशन्स) ओ. अशर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. देशात ‘मलाबार ग्रुप’ १ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
‘मलाबार ग्रुप’ने राज्यात ७०० कोटींची गुंतवणूक केली असून, येणाऱ्या काळात आणखी अतिरिक्त १ हजार कोटींची गुंतवणूक करेल, अशी घोषणा ‘मलाबार ग्रुप’चे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी केली. त्याचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या चार वर्षांत या समूहाने देशात १ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचा फायदा येणाऱ्या पिढीला होईल. मात्र, यातील ५० टक्के रोजगार हे महाराष्ट्रातच उपलब्ध करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय ब्रँडना जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधानांनी रत्न, आभूषण, हिरे या उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला चालना देण्यासाठी, रोजगारनिर्मितीत व निर्यात वाढीसाठी लक्ष घातले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत रत्न, आभूषण उद्योगात भारत चीनला मागे टाकत जगात पहिल्या क्रमांकावर झेप घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. एम. पी. अहमद यांनी मुंबईत ‘मलाबार नॅशनल हब’ची सुरुवात केल्याबद्दल फडणवीस यांनी धन्यवाद दिले. ‘वन नेशन’ आणि ‘वन प्राइझ’ यासाठी ‘मलाबार ग्रुप’चे प्रयत्न स्वागतार्ह आहेत. हा उद्योगसमूह आपल्या सीएसआर फंडातून गरजूंना अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप योजना राबवितो असेही ते म्हणाले.
डॉ. विजय दर्डा यावेळी म्हणाले, गणेशोत्सव संपन्न होत असताना ‘मलाबार ग्रुप’ने महाराष्ट्रात १ हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आज मी खूप आनंदित झालो आहे. ४० हजार कोटींची उलाढाल असणारा ‘मलाबार ग्रुप’ हा आभूषण क्षेत्रातील भारतातील प्रथम क्रमांकाचा समूह आहे. २४ हजार लोकांना त्यांनी रोजगार दिला. असे गौरवोद्गारही डॉ. दर्डा यांनी काढले. शरद पवार मुख्यमंत्री असताना वांद्रे-कुर्ला संकुल येथे २० एकर जागा दिली. त्यावर ‘बीकेसी’त मोठे ‘डायमंड हब’ उभे राहिले. नंतर या उद्योगाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा उद्योग शेजारच्या गुजरातेत गेला. या उद्योगाने गुजरातमध्ये चार लाख लोकांना रोजगार दिला आहे. आपण डायमंड इंडस्ट्रीच्या समस्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. विजय दर्डा यांनी राज्य व केंद्र सरकारला केले. ‘आयटी’नंतर परदेशात ज्वेलरी पाठविणारा सगळ्यांत मोठा उद्योग हाच आहे. पंतप्रधानांनी ७५ बिलियन डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याची सुरुवात फडणवीस यांच्या पुढाकारामुळे मुंबईत ‘मलाबार’च्या निमित्ताने झाल्याचे डॉ. दर्डा म्हणाले. सरकारने विकासाला चालना देण्यासाठी मुंबईत तिसरे विमानतळ उभाण्याची सूचना त्यांनी केली.
कार्यक्रमाला ‘जेजेपीसी’चे उपाध्यक्ष किरीट भन्साली, ‘मलाबार गोल्ड समूहा’त हिऱ्यांचे भागीदार असणारे मिलन पारेख, घनश्याम ढोलकीया, गोल्ड असोसिएशनचे अध्यक्ष सियाम मेहरा, ‘मलाबार गोल्ड’चे रिजनल हेड फनजिम अहेमद, गोल्ड किंग पृथ्वीराज कोठारी यांची उपस्थिती होती. ‘मलाबार ग्रुप’चे उपाध्यक्ष अब्दुल सलाम केपी यांनी आभार प्रदर्शन केले.
आम्ही आमच्या प्रवासाची ३० गौरवशाली वर्षे साजरी करीत असताना, आज ‘मलाबार नॅशनल हब’चे उद्घाटन हा आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आणि एक महत्त्वाची बाब आहे. यामुळे आमच्या जागतिक वाढीच्या आकांक्षेला अधिक चालना मिळेल आणि वाढीच्या पुढील टप्प्याचा पाया रचला जाईल. आम्ही देशभरात १९० पेक्षा जास्त शो-रूमचे नेटवर्क वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा हब विकसित करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात येऊ शकलो.
- एम. पी. अहमद, अध्यक्ष, मलाबार समूह