मुंबई – वांद्रे येथे इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना ताजी असतानाच मालाड येथे मोठी इमारत दुर्घटना घडली. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे मालाडच्या न्यू कलेक्टर कपाऊंड येथील रहिवासी इमारत ढासळली. रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. त्यात ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ८ लोकांचा समावेश आहे.
मोहम्मद रफी काही वेळासाठी त्यांच्या घरातून बाहेर गेले होते. परंतु जेव्हा ते परतले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी जगाचा निरोप घेतला होता. मोहम्मद रफी म्हणाला की, खूप पाऊस पडत होता, मी दूध आणण्यासाठी घराबाहेर पडलो होते. परंतु जेव्हा परतलो तेव्हा सगळं काही संपलं होतं. कुटुंबात आम्ही ९ जण राहत होतो. माझी पत्नी, भाऊ आणि सहा मुलं होती. लॉकडाऊनमध्ये अशीच अवस्था होती. घराची कंडिशन ठीक होती जर काही गडबड असेल तर खाली करायला सांगत होते. मग अचानक हे कसं घडलं हे देवालाच माहिती अशी खंत मोहम्मदनं बोलून दाखवली.
इमारत ढासळल्याने ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
मुंबईच्या मालवणी परिसरात ३ मजली इमारत ढासळल्याने ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला. तर अन्य ७ जण जखमी झाले आहेत. या अपघातात ८ लहान मुले आणि ३ व्यक्तींचा मृत्यू झाला. महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मालवणी परिसरात अब्दुल हमीद रोडवर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या त्यानंतर शोधकार्याला सुरूवात झाली.
ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता अधिकारी वर्तवत आहेत. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तौक्ते वादळात इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
दुर्घटनेतील मृतांची नावं-
१. साहिल सरफराज सय्यद (९ वर्षे)
२. आरिफा शेख (९ वर्षे)
३. शफिक मोहम्मद सलीम सिद्दीकी (४५ वर्षे)
४. तौसिफ शफिक सिद्दीकी (१५ वर्षे)
५. एलिशा शफिक सिद्दीकी (१० वर्षे)
६. अल्फिसा शफिक सिद्दीकी (दीड वर्षे)
७. अफिना शफिक सिद्दीकी (६ वर्षे)
८. इशरत बानो शफिक सिद्दीकी (४० वर्षे)
९. रहिसा बानो रफिक सिद्दीकी (४० वर्षे)
१०. तहेस सफिक सिद्दीकी (१२ वर्षे)
११. जॉन इरान्ना (१३ वर्षे)
दुर्घटनेतील जखमींची नावं-
१. मरीकुमारी हिरांगणा (३० वर्षे) प्रकृती गंभीर
२. धनलक्ष्मी बेबी (३६ वर्षे) प्रकृती स्थिर
३. सलीम शेख (४९ वर्षे) प्रकृती स्थिर
४. रिझवान सय्यद (३३ वर्षे) प्रकृती स्थिर
५. सूर्यमणी यादव (३९ वर्षे) प्रकृती स्थिर
६. करीम खान (३० वर्षे) प्रकृती स्थिर
७. गुलझार अहमद अन्सारी (२६ वर्षे) प्रकृती स्थिर