मालाड पूर्व आणि पश्चिम विभाग कार्यालय असे होणार विभाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:20+5:302021-02-05T04:35:20+5:30
पालकमंत्र्यांचे आश्वासन मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: महापालिकेच्या पी उत्तर वॉर्डचे भविष्यात मालाड पूर्व व मालाड पश्चिम असे ...
पालकमंत्र्यांचे आश्वासन
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महापालिकेच्या पी उत्तर वॉर्डचे भविष्यात मालाड पूर्व व मालाड पश्चिम असे विभाजन होणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई महानगरपालिकेच्या एकूण विभाग कार्यालयांची संख्या २४ वरून २५ होणार आहे.
मालाड पश्चिम मढ जेट्टीपासून ते थेट मालाड -कांदिवली पूर्व असलेल्या सध्याच्या अवाढव्य पसरलेला पी उत्तर वॉर्ड हा मुंबईतील सर्वात मोठा वॉर्ड असून, याची लोकसंख्या सुमारे ११ लाखांच्या आसपास आहे. दिंडोशी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना मालाड पूर्व आणि पश्चिम करता एकच विभाग कार्यालय असून, पूर्व बाजूकडील जनतेला पश्चिमेस जाणे त्रासाचे ठरते. याकरिता पी उत्तर विभाग कार्यालयाचे विभाजन करून मालाड पूर्व बाजूस विभाग कार्यालय असावे, या करता मागिल पाच वर्षांपासून ही मागणी आमदार सुनील प्रभु यांनी विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून लावून धरली होती व त्यास नगरविकास कार्यालयाने मंजुरी दिली होती, तसेच महापालिका स्तरावर याबाबत बैठका झाल्या होत्या; परंतु मालाड पूर्व भागाकरता अद्याप जागा निश्चित झाली नसून जागा निश्चित करून इमारती करता अर्थसंकल्पात तरतूद करून येणाऱ्या वर्षात महापालिका प्रभाग कार्यालय सुरू करण्यात यावे, याकरिता पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली असता, याकरिता आपल्या दालनात विशेष बैठक बोलावून कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. आमदार प्रभू यांनी सदर माहिती लोकमतला दिली.
तसेच मागील पाच वर्षांपासून सतत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, मालाड पूर्व आणि पश्चिम भागाकरिता एकच रेशनिंग कार्यालय असून, पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पूर्व भागाकरिता स्वतंत्र विभाग कार्यालय मंजूर झाले असले तरी कार्यालयाकरिता जागा उपलब्ध झाली नसून, याकरितादेखील आपल्या दालनात विशेष बैठक बोलावून कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे काम कोरोना टाळेबंदीच्या कालावधीत मंदावले असून, याबाबतदेखील पालकमंत्र्याच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक आयोजित करून कामाला गती देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे आमदार प्रभू यांनी शेवटी सांगितले.
--------------------------------------