मालाडला जनता दलासह विविध डाव्या पक्षांची धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:27 AM2020-01-09T05:27:54+5:302020-01-09T05:28:02+5:30
बंदला पाठिंबा म्हणून बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मारुती मंदिराजवळ जनता दलासह विविध डाव्या पक्षांच्या वतीने धरणे धरण्यात आली.
मुंबई : बंदला पाठिंबा म्हणून बुधवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मारुती मंदिराजवळ जनता दलासह विविध डाव्या पक्षांच्या वतीने धरणे धरण्यात आली. भाजपेतर सर्व पक्ष संघटनांसह जनता दलानेही बंदला पाठिंबा दिला. मोदी सरकारच्या मूठभर उद्योगपतींचे हित साधणाऱ्या कारभाराविरोधात यावेळी आवाज उठविण्यात आला.
मोदी सरकारच्या कारभाराची गेली साडेपाच वर्षे म्हणजे, भारताने आर्थिक विकासाचा गमावलेला कालावधी आहे. त्याआधीच्या काळात सात ते आठ टक्के असलेला आर्थिक विकासाचा दर एक-दीड टक्क्यावर आला आहे. स्वत: सरकारही आता आर्थिक विकासाचा दर साडेचार-पाच टक्क्यांवर आल्याचे कबूल करू लागले आहे. तज्ज्ञांच्या मते मात्र, खरा दर एक-दीड टक्केच आहे. याची परिणती मुख्यत: रोजगारनिर्मिती घटण्यात झाली आहे. बेरोजगारीचा दर गेल्या ४५ वर्षांत सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे, अशी माहिती जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, प्रधान महासचिव प्रताप होगाडे, उपाध्यक्ष सुहास बने, कार्याध्यक्ष सलिम भाटी, शफी आलम, मतिन खान, जेडीएसच्या महासचिव ज्योती बेडेकर, अपर्णा दळवी, जिल्हाध्यक्ष जगदिश नलावडे, संजीवकुमार सदानंद, जावेद पठाण, चारुल जोशी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी उपस्थित होते.