मालाड दुर्घटना : काळ्या यादीतील ठेकेदाराला मिळाले होते भिंतीचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 02:59 AM2019-07-06T02:59:57+5:302019-07-06T03:00:08+5:30
मालाड पूर्व, कुरार येथील पिंपरीपाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत सोमवारी मध्यरात्री कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद स्थायीच्या बैठकीत शुक्रवारी उमटले.
मुंबई : मालाड येथील संरक्षण भिंत बांधणाऱ्या ठेकेदाराला तीन वर्षांपूर्वीच नालेसफाई घोटाळा प्रकरणात काळ्या यादीत टाकले होते. मात्र जलाशयाच्या संरक्षण भिंतीचे २१ कोटींचे कंत्राट त्याला मिळावे यासाठी अहवाल दाबला, ही धक्कादायक बाब विरोधी पक्षांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या निदर्शनास आणली. ओम्कार इंजिनीअरिंग अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर या ठेकेदाराला या प्रकरणी पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत.
मालाड पूर्व, कुरार येथील पिंपरीपाडा येथे पालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत सोमवारी मध्यरात्री कोसळून २७ जणांचा मृत्यू झाला. याचे तीव्र पडसाद स्थायीच्या बैठकीत शुक्रवारी उमटले. या भिंतीचे काम करणाºया ठेकेदाराला ५ डिसेंबर २०१५ रोजी कामाचे आदेश मिळाले. परंतु, नालेसफाईच्या घोटाळ्यात दोषी आढळल्याने त्याला फेब्रुवारी २०१६ मध्ये काळ्या यादीत टाकण्यात आले. त्याला भिंतीचे काम मिळावे म्हणून नालेसफाईचा अहवाल दाबला, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तर, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. मुसळधार पावसामुळे येथे पाणी जाण्यासाठी तयार केलेली जागा पाण्याने भरली. यामुळे पाण्याचा दाब वाढला. माती भुसभुशीत होऊन भिंत कोसळली, असे अतिरिक्त आयुक्त जºहाड यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी यासंदर्भात अहवालाची मागणी केली. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
दरम्यान, भिंती बांधण्यासाठी पालिकेने ठेकेदाराला २१ कोटी ७ लाख रुपये दिले. तरीही भिंतीचे काम निकृष्ट झाले. उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यांच्यातर्फे या दुर्घटनेची चौकशी करून अहवाल १५ दिवसांत सादर होईल, असे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी सांगितले.