Join us

बंद कुलूप तोडून घरफोडी करणारे सापडले; डोंबिवलीच्या जंगलातून गाशा गुंडाळला 

By गौरी टेंबकर | Published: March 13, 2024 3:56 PM

मालाड पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

मुंबई: गर्मीच्या सुट्टीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या लोकांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मालाड पोलिसांना यश मिळाले. याप्रकरणी त्यांनी चौघांना अटक केले असून त्यात चोरीचा माल खरेदी करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. तर एकावर तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद शाबीज खान (३७), अमित यादव उर्फ बाबू (३३), देवाराम चौधरी (५०) अशी असून आणि एका सोनाराचाही यात समावेश आहे. मालाड पश्चिमच्या रामचंद्र लेन याठिकाणी एका इमारतीमध्ये दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून घराच्या कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. त्याप्रकरणी तक्रार मिळाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानुसार परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पन्हाळे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल चार दिवस अहोरात्र तांत्रिक तपास सुरू केला. अखेर डोंबिवलीच्या गोलीवली गावात असलेल्या जंगल सदृश्य भागातून सापळा रचत शिताफीने त्यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून एकूण चोरीला गेलेल्या मालमत्तेपैकी ५ लाखांचा मुद्देमाल तसेच घरफोडीसाठी लागणारे साहित्यही हस्तगत करण्यात आला आहे.

सर्व आरोपी अभिलेखावरील...अटक करण्यात आलेला याच्याविरुद्ध चारकोप आणि नवघर पोलीस ठाण्यात मालमत्तेचे तर यादव याच्यावर अकोला आरे नालासोपारा तुळींज तसेच गुजरात या ठिकाणी याच प्रकारचे १९ गुन्हे दाखल आहेत. तर चौधरी हा देखील बंगळुरूमध्ये दोन गुन्ह्यात आरोपी असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.