मालाड रेल्वे स्थानक :प्रचंड गर्दी, धोकादायक पूल, वाढती अस्वच्छता; अरुंद फलाटांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:37 AM2017-10-14T04:37:44+5:302017-10-14T04:37:48+5:30
पश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर दिसून येत आहे. मालाड रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी उसळते.
सागर नेवरेकर
मुंबई : पश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर दिसून येत आहे. मालाड रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी उसळते. सकाळच्या वेळी मालाड येथून लोकल पकडणे, म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. बोरीवलीवरून सकाळी येणाºया लोकल गाड्या या पूर्णपणे भरलेल्या असतात. त्यामुळे मालाडकरांना ट्रेन पकडणे एक दिव्य असते. मालाड येथील १, २, ३ आणि ४ क्रमांकाची फलाटे अरुंद असून, ही समस्या मिटणार कधी, असा सवाल रेल्वे प्रवाशांनी उपस्थित केला.
मालाड स्थानकावर दररोज किमान एक लाखापेक्षा जास्त प्रवासी ये-जा करतात. मालाड स्थानकावर तीन पादचारी पूल आहेत. या तिन्ही पुलांवर रात्रीचा अपवाद वगळल्यास गर्दी असते. तिन्ही पूल अरुंद असल्याने पुलावर गर्दी होते. सकाळी चर्चगेटच्या दिशेने जाणाºया लोकलमध्ये पाय ठेवणे कठीण होत असल्याने, अनेक जण बोरीवलीपर्यंत उलटा प्रवास करून त्याच लोकलने परत येतात. मालाडची वाढती गर्दी पाहता, पादचारी पूल, स्कायवॉक आणि भुयारी मार्गाची गरज आहे, तसेच मालाड स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील बाहेरील बाजूस अरुंद रस्ते, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि वाहतूककोंडी अशा समस्यांना प्रवासी तोंड देत आहेत. मालाड स्थानकावर नगरसेवकांच्या निधीतून रोपांसाठीच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, आता या कुंड्यांचे रूपांतर कचरा कुंडीमध्ये झाले आहे, तसेच फलाट क्रमांक २ व ३ वरील बोरीवलीच्या दिशेने असलेल्या पुलावर छप्पर नाही. १, २, ३ व ४ क्रमांकाच्या फलाटांची रुंदी कमी आहे. स्थानकावर मध्यभागी नवीन पूल बांधला असून, या पुलाचा वापर करणे प्रवासी टाळतात. फलाट क्रमांक १ वर टी स्टॉल असून, त्याची अडचण होते. मालाड व कांदिवलीदरम्यान झोपडपट्टी आणि कारखाने आहेत. तेथील कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकला जातो. त्यामुळे रेल्वे रुळावर दुर्गंधी पसरते.
१ लाखाहून अधिक प्रवासी-
मालाडचा विस्तार पूर्वीपेक्षा आता बºयाच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मालाड पूर्वेकडील आप्पापाडा आणि पश्चिमेकडील मढ व मालवणीपर्यंत वाढत गेला आहे. येथे कामानिमित्त येणाºयांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मालाड स्थानकांवरून दररोज सुमारे १ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
धोकादायक पूल : स्थानकाच्या बाजूला जुना पादचारी पूल आहे. पुलाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या पादचारी पुलाचे अर्धे काम झाले आहे, परंतु सध्या काम थांबले आहे. याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
प्रलंबित मागण्या : स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा, जादा तिकीट घरे, फलाटांची लांबी वाढविणे, सरकते जिने, फलाटावर छप्पर हवे, अशा अनेक मागण्या रेल्वे प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत आहेत, परंतु रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
रेल्वेचे दुर्लक्ष
स्थानकावरील पादचारी पूल हा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकारातून बनविण्यात आला आहे, तसेच ३ सरकते जिने मंजूर करण्यात आले आहेत. सरकत्या जिन्याचे येत्या तीन महिन्यांत काम सुरू होईल. मालाड पूर्वेकडील स्थानकाकडे येणाºया जागेचे रुंदीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, परंतु काही लोकांनी त्याला विरोध केला. त्याचा प्रस्ताव पडून आहे. स्थानकाबाहेरील रस्ता मोकळा व्हावा, यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मालाड स्थानकावर नगरसेवकांच्या निधीतून आसने आणि रोपांच्या कुंड्या दिल्या आहेत, परंतु रेल्वे प्रशासनाने या गोष्टींची देखभाल दुरुस्ती केली नाही. या प्रकरणी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. दोन वेळा मी स्वत: दुरुस्ती केली, पण वारंवार लक्ष देणे अवघड आहे. याची तक्रार महाव्यवस्थापकाकडे करण्यात आली आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.
- विनोद शेलार, जिल्हाध्यक्ष,
उत्तर मुंबई, भाजपा
सातत्याने पाठपुरावा : विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी सर्व शिवसेना पदाधिकाºयांसोबत रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांबरोबर बैठक घेतली. त्यात मालाड स्थानकावरील सर्व समस्या मांडण्यात आल्या होत्या. रेल्वेच्या अर्थ संकल्पात तरतूद करून केंद्र सरकारने रेल्वे प्रशासनाकडे लक्ष दिले पाहिजे. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे याचा पाठपुरावा शिवसेना करत आहे, तरी रेल्वेचे प्रशासन ठप्प आहे.- सुनील प्रभू, आमदार
स्कायवॉक हवा
मालाड येथे स्कायवॉक उभारण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी वारंवार केली आहे. मात्र, या मागणीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ही मागणी मान्य झाली, तर गर्दीचा भार कमी होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.