मुंबई: मालाडच्या कुरारमध्ये संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 26 वर गेला आहे. सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कुरारमधील संरक्षक भिंत कोसळली. त्याखाली अनेक घरं, संसार आणि स्वप्नं दबली. या एका दुर्घटनेमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. काहींनी यात मायेची माणसं गमावली.
मालाडमध्ये घडलेल्या दुर्घटनेत पंचविशीतल्या शीतल शर्मानं या दुर्घटनेत वडील गमावले. परिचारिका असलेली शीतल दुर्घटनेवेळी कामावर होती. शेजाऱ्यांनी फोन करुन तिला घटनेची माहिती दिली. ‘पहिल्यांदा विश्वास बसला नाही... अन् त्यानंतर धावतच घर गाठलं, जेव्हा पोहोचले तेव्हा माणसंही नव्हती आणि माझं घरंही... आई-बाबा, भाऊ-बहीण कुणाचाच पत्ता लागत नव्हता. डोकं बधिर झालं होतं, काहीच सुचेनासं झालं होतं..’ हे सांगताना ती खालीच कोसळली. तिच्यासोबत असणारी शेजारची तरुणी स्वप्नालीनं सांगितलं की, शीतलचे बाबा या दुर्घटनेत गेले. आई-बहीण आणि भावावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी तिच्या बाबांवर भिंती नसलेल्या, ताडपत्री अंथरलेल्या घरात अंत्यसंस्कार केले. शीतलला मानसिक धक्का बसला आहे, असं म्हणत दोन्ही हातांनी तिला सावरत स्वप्नाली तिला आईला पाहायला रुग्णालयात घेऊन गेली.