Malad Wall Collapse: 'सुट्टीसाठी आलो अन् घरच वाहून गेलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:27 AM2019-07-04T08:27:40+5:302019-07-04T08:32:05+5:30
भिंत कोसळल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त
- स्नेहा मोरे
मुंबई: मालाड पूर्वेकडील कुरार येथील पिंपरी पाडा, आंबेडकरनगर येथे संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २६ वर जाऊन पोहोचला आहे. घटनास्थळावरील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू असताना काल ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह काढण्यात आले. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. मृत तिघेही मूळचे बार्शी येथील होते. तर विविध रुग्णालयांत दाखल जखमींचा आकडा ७२ झाला असून, २३ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कुरारमध्ये सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळली आणि अनेक झोपड्या त्याखाली दबल्या गेल्या. यामध्ये अनेकांनी मायेची माणसं गमावली. तर काहींच्या डोक्यावरील छप्परच त्या काळरात्रीनं हिरावून नेलं. बंगळुरूहून मालाडला सुट्टीसाठी आलेल्या मनिष सिंग गुप्तासाठी सोमवार घातवार ठरला. सध्या बंगळुरूत फार्मासिस्टचे शिक्षण घेणाऱ्या आणि जन्मापासून कुरारमध्ये राहणाऱ्या मनिषचं घर भिंत कोसळल्यानं उद्ध्वस्त झालं.
‘काही दिवस सुट्टीवर यायचे म्हणून बंगळुरूहून निघालो. अर्ध्या रस्त्यात आल्यावर मुंबईत नका येऊ, घरी प्रॉब्लेम झालाय असे फोन येऊ लागले. नातेवाइकांकडून तेच मेसेज येत होते, मात्र पुन्हा बंगळुरूला जाण्यापेक्षा मुंबईत जाऊ असं ठरवलं. बुधवारी पहाटे मुंबईत आलो अन् घर वाहून गेल्याचे कळले. काही क्षणांसाठी विखुरलेल्या सामानाकडे, पडलेल्या भिंतींकडे आणि पायाखालून सरकणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्याकडे पाहतच राहिलो. घरातली माणसं सुरक्षित आहेत, मात्र आईवडिलांनी भविष्यासाठी केलेली जमा पुंजी वाहून गेली,’ असं मनिषनं सांगितले.
पुनर्विकासाविषयी तो म्हणाला, समजायला लागल्यापासून पुनर्विकास होणार असं ऐकत आलोय; मात्र लोकप्रतिनिधी इथं केवळ मतं मागायला येतात. त्यानंतर फिरकतही नाहीत. त्यांना आमच्याबाबत काहीही देणंघेणं नाही. असं असताना पुनर्विकास होणार कसा?; असा सवाल मनिषनं उपस्थित केला. त्यावेळी भविष्याची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.