मलनि:सारण कामात कोट्यवधींचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 04:24 AM2017-08-12T04:24:51+5:302017-08-12T04:24:59+5:30
मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामात अनियमितता असून, तब्बल ४४ कोटी ३६ लाख रुपयांची अतिरिक्त खिरापत कंत्राटदाराला वाटल्याचे ताशेरे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात, कॅगने आपल्या अहवालात ओढले आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण वाहिन्या टाकण्याच्या कामात अनियमितता असून, तब्बल ४४ कोटी ३६ लाख रुपयांची अतिरिक्त खिरापत कंत्राटदाराला वाटल्याचे ताशेरे, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक अर्थात, कॅगने आपल्या अहवालात ओढले आहेत.
कॅगचा स्थानिक संस्था अहवाल शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. मुंबईतील मलनि:सारण व्यवस्थेची जबाबदारी असणाºया मलनि:सारण प्रकल्प, मलनि:सारण प्रचालन आणि विल्हेवाट प्रकल्प विभाग या तीन विभागांकडे असते. मुंबईत रोज २,१४६ दशलक्ष सांडपाणी तयार होते. त्यातील १,०९८वर प्रक्रिया होते. १,०४८ दशलक्ष सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते. पालिकेने २०२५ सालापर्यंत पाच टप्प्यांत तब्बल ५,५७०.४० कोटींचा बृहत आराखडा तयार केला. त्यासाठी २००१च्या दरानुसार काम करण्याचा निर्णय घेतला.
या कामासाठी जुलै २०१६ पर्यंत कंत्राटदारांना ४४.३६ कोटी अतिरिक्त देण्यात आले. मात्र, सूक्ष्म भुयारी कामांवर १२४.३० कोटी खर्चूनही ते बृहत आराखड्यानुसार प्रकल्प कार्यान्वित करू शकले नाहीत. या आराखड्यानुसार ३६३ किलोमीटर मलनि:सारण वाहिन्यांपेकी, केवळ ६२.०१ किमी. वाहिन्यांचे पुनर्वसन केले. या कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार केल्याचे कॅगने सांगितले. चुकीच्या अंदाजपत्रकामुळे २२.०५ कोटींचा अतिरिक्त निधी कंत्राटदारांना वाटण्यात आला. विभागाने निर्धारित केलेल्या १,२५६ किमीच्या जीर्ण वाहिन्यांच्या अवस्था तपासण्याचे काम केले. त्यावर तब्बल ९० कोटी खर्च केले, परंतु वाहिन्यांचा विस्तार अथवा पुनर्विकासासाठी निश्चित कार्यक्रम ठरविला नाही. विशेष म्हणजे, केवळ प्रकल्प व्यवस्थापन, सल्ला सेवेखातर तब्बल १४१.७८ कोटी खर्च केले.
चुकीचे अंदाजपत्रक
केवळ ६२.०१ किलोमीटर वाहिन्यांचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.