Join us

बदलत्या वातावरणामुळे मुंबईला मलेरिया, डेंग्यूचा डंख; साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 09:46 IST

पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाली आहे. यंदा जुलैमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने ऑगस्टमध्ये सुरुवातील ब्रेक घेतला. त्यानंतर अखेरीसच्या दिवसांमध्ये अधूनमधून सरी कोसळत होत्या. या बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथींचे आजार बळावले आहेत. 

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलेरिया आणि डेंग्यूच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्याच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. 

मलेरिया आणि डेंग्यू हे दोन्ही आजार डासांमुळे होतात.  या काळात पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे पाण्याची डबकी तयार होतात. त्यात पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसू आले आहे. 

दरवर्षी पावसात रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. अनेकदा नागरिकांना दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने ते याच पाण्यातून ये-जा करतात. रस्त्यांवरील बिळांमध्ये पाणी शिरल्याने घुशी, उंदीर बाहेर येतात. त्यांचे मलमूत्र साचलेल्या पाण्यात असते. शरीरावरील विशेषत: पायावर असलेली जखम अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिस होतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

पालिकेने मारले ३४,७८१ उंदीर-

१) संपूर्ण ऑगस्टमध्ये लेप्टोस्पायरोसिसचे २७२ रुग्ण आढळून आले आहेत. 

२) या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी महिनाभरात ३३ हजार ६३४ संशयित नागरिकांना गोळ्या देण्यात आल्या. 

३) त्यासोबत या काळात महापालिकेने जवळपास ३४ हजार ७८१ उंदीर मारले आहेत.

टॅग्स :मुंबईडेंग्यूमलेरियाहॉस्पिटल