मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धुमाकूळ सुरूच
By संतोष आंधळे | Published: October 25, 2023 10:02 PM2023-10-25T22:02:12+5:302023-10-25T22:03:35+5:30
Mumbai Health News: सध्या मुंबईकर हवेच्या प्रदूषणामुळे शवसवीकारच्या व्याधीमुळे त्रस्त आहेत. अनेकांना खोकला आणि सर्दीच्या लक्षणांनी हैराण केले आहे. या अशा परिस्थितीत मलेरिया आणि डेंग्यू या डासांमुळे होणाऱ्या आजराच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.
- संतोष आंधळे
मुंबई - सध्या मुंबईकर हवेच्या प्रदूषणामुळे शवसवीकारच्या व्याधीमुळे त्रस्त आहेत. अनेकांना खोकला आणि सर्दीच्या लक्षणांनी हैराण केले आहे. या अशा परिस्थितीत मलेरिया आणि डेंग्यू या डासांमुळे होणाऱ्या आजराच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार साथीच्या आजारांची रुग्णांची आकडेवारी वाढत असून गॅस्ट्रोचे आजाराने सुद्धा डोके वर काढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.
या आकडेवारीवरून अद्यापही डासांचे प्रमाण मुंबईत मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे होणारे आजार नागरिकांना होत आहे, त्यामुळे घराभोवतालची डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेने केली आहे.महापालिकेतर्फे धूरफवारणी आणि अन्य माध्यमाचा उपयोग करून शहरातील डासांचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र तरीही या डासामुळे होणारे आजार मुंबईकरांना छळत आहेत. दर आठवड्याला महापालिकेचा आरोग्य विभाग साथीच्या आजाराची माहिती जाहीर करत असतो. गेल्या आठवड्यात सुद्धा मलेरिया आणि डेंग्यू या आजराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली होती.
गेल्या आठवड्यात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेऊन हे आजार पसरू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून सूचना दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रात मुंबईच्या कोणत्या विभागात किती रुग्ण याचीही माहिती दिली होती.
डेंग्यूची लक्षणे
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
मलेरिया लक्षणे
थंडी वाजून ताप येणे. ...
ताप येतो आणि जातो.
संध्याकाळी ताप येतो. ...
सांधेदुखी, डोकेदुखी तसेच थकवा जाणवणे.
१ ते २२ ऑक्टोबर कालावधीतील रुग्णसंख्या
मलेरिया - ६८०
लेप्टो - ३२
डेंग्यू - ७३७
गॅस्ट्रो - २६३
हिपॅटायटिस - ३९
चिकुनगुनिया - २४
स्वाइन फ्लू - ५१
(स्रोत - मुंबई महानगर पालिका आरोग्य विभाग )