Join us

मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण घटले; महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा; आकडेवारी जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 1:58 PM

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही महिन्यांत मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत असून, ज्यामध्ये प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू  या ...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही महिन्यांत मुंबईत डासांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण वाढत असून, ज्यामध्ये प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू  या आजारांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने या गेल्या दोन महिन्यांतील या दोन आजारांच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या दाव्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात या आजारांची रुग्णसंख्या कमी झाली आहे. 

या आकडेवारीवरून अद्यापही डासांचे प्रमाण मुंबईत मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे होणारे आजार नागरिकांना होत आहे, त्यामुळे घराभोवतालची डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेतर्फे धूरफवारणी आणि अन्य माध्यमांचा उपयोग करून शहरातील डासांचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तरीही या डासांमुळे होणारे आजार मुंबईकरांना छळत आहेत.

डेंग्यूची लक्षणे

  डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे.   एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरविण्यास कारणीभूत ठरत असतात.   या आजारात तापामुळे काही जणांना हाडे आणि स्नायूंत खूप वेदना जाणवत असतात.   त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डेंग्यूचे जीनोम सिक्वेन्सिंग करणार

साध्या शब्दात सांगायचे झाले तर प्रत्येक विषाणूची स्वतःची एक जनुकीय संरचना असते. त्या विषाणूच्या व्हायरसची संरचना कशी आहे ? त्यामध्ये काही बदल घडत आहेत का याचा शोध घेणे म्हणजे जीनोम सिक्वेन्सिंग. गेल्या काही महिन्यापासून डेंग्यूच रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे डेंग्यू च्या विषाणूच्या संरचनेत सुद्धा काही बदल होत आहे का ? याचा शोध पालिकेचा आरोग्य विभाग करणार आहे. सध्याच्या घडीला नमुने गोळा करण्याचे काम सुरु आहे. सर्व नमुने एकत्र झाले कि त्यांचे कस्तुरबाच्या प्रयोग शाळेत त्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

मलेरिया लक्षणे

  थंडी वाजून ताप येणे.   ताप येतो आणि जातो.  संध्याकाळी ताप येतो.    सांधेदुखी, डोकेदुखी तसेच थकवा जाणवणे.

आयुक्तांना सूचना

अजूनही काही प्रमाणात  रुग्ण या आजाराने रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये उपचार घेत आहेत. तर काही रुग्णांचा आजार अधिक बळावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेऊन हे आजार पसरू नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून सूचना दिल्या होत्या.

टॅग्स :मलेरियाडेंग्यू