रुग्णांमध्ये मलेरियाची दहशत,थेट मेंदू, किडनीवर होतो परिणाम; ६ महिन्यांत १ हजार ६१२ रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:34 AM2024-06-12T10:34:02+5:302024-06-12T10:36:51+5:30

डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळे भारतात दरवर्षी लाखो रुग्णांचा मृत्यू होतो.

malaria fear in patients direct effect on brain kidneys about 1 thousand 612 patients in six months in mumbai  | रुग्णांमध्ये मलेरियाची दहशत,थेट मेंदू, किडनीवर होतो परिणाम; ६ महिन्यांत १ हजार ६१२ रुग्ण 

रुग्णांमध्ये मलेरियाची दहशत,थेट मेंदू, किडनीवर होतो परिणाम; ६ महिन्यांत १ हजार ६१२ रुग्ण 

मुंबई : डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया या आजारामुळे भारतात दरवर्षी लाखो रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे या आजाराची रुग्णांमध्ये मोठी दहशत आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण सापडतात. मुंबईत गेल्या सहा महिन्यात या आजाराचे एक हजार ६१२ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराचा परिणाम थेट मानवाच्या मेंदूवर आणि किडनीवर होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
ॲनाफिलीस नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चावण्यामुळे मलेरियाचा व्हायरस शरीरात जातो.   

पी. फॅल्सीपेरम आणि पी. व्हायव्हॅक्स या दोन प्रकारचा मलेरिया सगळ्यात गंभीर असून, ते शहरात आढळून येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.  

ॲनाफिलीस डास चावल्यावर ८ ते १४ दिवसांत ताप येतो. हे डास स्वच्छ पाण्यात वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे घरातील फुलदाण्या, वातानुकूलित यंत्रे, पाण्याचे पिंप आदींतील पाणी काढून टाकावे. गच्चीवर, घरांभोवती पाणी साचू देऊ नका, अन्यथा या पाण्यात त्या डासांची वाढ होऊन त्याचा त्रास होऊ शकतो.  

बचाव कसा कराल ?

१) लहान मुले आणि गर्भवती स्त्रिया यांना या आजाराचा धोका सर्वांत जास्त प्रमाणात असतो. कारण या दोघांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. 

२) विशेषकरून सायंकाळी मलेरियाचे डास चावतात. डास एका जागी बसू नयेत म्हणून घरात पंखा, एसीचा वापर करावा, तसेच सायंकाळच्या वेळेत दरवाजे बंद ठेवावेत. 

३) खिडक्यांना जाळ्या बसून घ्याव्यात. डास मारण्याच्या औषधाचा वापर करावा. झोपताना संपूर्ण अंगभर कपडे घालून झोपावे, त्यामुळे डास चावणार नाहीत. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. पावसाळी खड्डे व डबकी मातीने भरून टाका. 

मलेरियाचे मुंबईतील रुग्ण -

वर्ष        रुग्ण
२०१९- ४,३५७
२०२०- ५,००७
२०२१ - ५,१७२
२०२२- ३,९८५
२०२३ (११ जून) -१,३८०
२०२४ ( मे )- १,६१२

आजाराची लक्षणे-

१) ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, खूप ताप येणे.

२) मलेरियाचा डास चावल्यानंतर ८ ते १४ दिवसांत ही लक्षणे दिसतात.

मलेरिया घातक असला तरी त्याचे लवकर निदान झाल्यास उपचार घेता येतात. रक्ताच्या चाचणीद्वारे या आजाराची चाचणी करता येते. सुरुवातीच्या काळात योग्य उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मलेरियामध्ये चार प्रकार असून, त्यानुसार रुग्णांना औषधे दिली जातात.

मलेरियाच्या अधिक गुंतागुंतीमुळे त्याचा परिणाम शरीरावरील विविध अवयवांवर होऊन तो रुग्ण मृत पावल्याच्या घटना घडतात. विशेषत: मलेरियाचा किडनी, यकृत, फुफ्फुस, मेंदूवर परिणाम होतो. या आजाराचे स्वरूप गंभीर झाल्यास रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. काही वेळेस घरी राहूनही उपचार केले जातात. आजारपणात रुग्णांनी शक्यतो आराम केला पाहिजे. - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यकशास्त्र आणि अधीक्षक, सेंट जॉर्जेस रुग्णालय

Web Title: malaria fear in patients direct effect on brain kidneys about 1 thousand 612 patients in six months in mumbai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.